पुणे: पुण्यात सुरू असलेले विविध प्रकल्प, मेट्रो अन् पाऊस, यामुळे शहरातील रस्त्यांची ’वाट’ लागली आहे. रस्त्यांची डागडुजी वेळेत न झाल्याने अक्षरश: सर्वच प्रमुख रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्तादुरुस्तीसाठी महापालिकेकडून केवळ तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असल्याने खड्डे बुजणे तर दूरच; मात्र काही रस्त्यांची समपातळी देखील बिघडली आहे.
खड्डे, चुकीचे स्पीड ब्रेकर, रस्त्यावरचे पॅच, वर आलेली ड्रेनेजची झाकणे यातून आदळत मार्ग काढत जावे लागत असल्याने पुणेकरांचे कंबरडे मोडले आहे. असे असताना पालिकेने मात्र 5 हजार 103 खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. (Latest Pune News)
महापालिकेच्या पथ विभागाकडून रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती करून मलमपट्टी केली जात आहे. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसात रस्त्यांची दुरुस्ती केली जात असल्याने त्यांची कामे निकृष्ट होत आहेत. 1 एप्रिलपासून आजपर्यंत महापालिकेने 5 हजार 103 खड्डे भरल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
मात्र, शहरातील प्रमुख रस्ता असलेला बाणेर, पाषाण या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. शहरातील प्रमुख आणि अनेक अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे असताना महापालिकेने कोणते खड्डे बुजविले? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. खड्डे बुजविण्यासाठी महानगरपालिकेच्या पथ विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.
मात्र, हे पैसे खड्ड्यांत जातात, अशी उपरोधिक टीका नागरिकांमार्फत केली जाऊ लागली आहे. पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था होते. मेट्रो, पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन, एटीएमएस सिग्नल यंत्रणा, खासगी कंपन्यांमार्फत कामांसाठी रस्ते खोदले जात असल्याने खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. या खड्ड्यांमुळे पुणेकरांना मात्र कंबरदुखी, पाठदुखी आणि मानदुखीसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
महानगरपालिकेचा दावा फोल
यंदाच्या पावसाळ्यात महानगरपालिकेने तब्बल 5 हजार 103 खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. 25 हजार 600 स्क्वेअर मीटरवरील हे खड्डे असून, यासाठी पालिकेने 14 हजार 324 मेट्रिक टन माल वापरला. तसेच पावसाळी कामाअंतर्गत 609 चेंबर दुरुस्त केल्याचा दावा केला आहे. तर 90 रस्त्यांवरील पाणी साठणार्या ठिकाणांची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, हा दावा फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे.
मेट्रोमार्गावरील रस्त्यांची अवस्था बिकट
शहरात सार्वजनिक वाहतूकव्यवस्था वेगवान करण्यासाठी मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सध्या शिवाजीनगर ते हिंजवडी या बाणेर मार्गाने जाणार्या मार्गिकेचे काम सुरू आहे. मात्र, या कामामुळे या रस्त्यावरून मार्गस्थ होणे प्रचंड जिकिरीचे झाले आहे. थोड्या थोड्या अंतरावर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या मार्गावर वाहतूक कोंडी देखील कायम असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी ‘नको रे बाबा’ अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
12 मीटरच्या रस्तादुरुस्तीकडे दुर्लक्ष
पुण्यातील 12 मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते तयार करणे तसेच ते दुरुस्त करण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. या बाबतचेआदेशही आयुक्तांनी दिले आहे. असे असताना या रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही. खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाने 15 क्षेत्रीय कार्यालयांना जेट पॅचर मशिन, 15 आरएमयू रोड मेंटेनन्स मशिन देण्यात आले आहेत. असे असताना रस्त्यांवरील खड्डे मात्र कायम आहेत.
असे दुरुस्त केले जातात रस्ते
हॉटमिक्स : डांबर वितळवून त्यात खडी मिसळून रस्ता तयार केलाजातो किंवा खड्डा बुजवला जातो. या कालावधीत महापालिकेने येरवडा येथे उभारलेल्या हॉटमिक्स प्लांटमधील प्रक्रिया केलेले डांबर वापरण्यात आले.
कोल्डमिक्स : इमल्शन आणि खडी एकत्र करून खड्डे बुजविले जातात. विशेषत: पावसाळ्यात किंवा भर पावसात खड्डे कोल्डमिक्सद्वारे बुजविले जातात.
शहरातील रस्ते बुजविण्यासाठी पालिकेच्या पथ विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुण्यातील 5 हजार 103 खड्डे बुजविण्यात आले आहेत. यासाठी 14 हजार 324 मेट्रिक टन माल वापरण्यात आला आहे.
- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका