Khadakwasla dam water level
खडकवासला: चार धरणांच्या खडकवासला साखळीत सततच्या पावसामुळे जुन महिन्याच्या अखेरीस जवळपास पन्नास टक्के पाणी साठा झाला आहे. एवढा साठा जुनमध्ये होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोमवारी (दि. 30) सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत 14.52 टीएमसी म्हणजे 49.81 टक्के पाणी साठा होता.
धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत नसला तरी रिमझिमीसह पडणार्या सततच्या पावसामुळे चारही धरणांत आवक पाण्याची सुरू आहे. शनिवारी (दि.28) सायंकाळी धरण साखळीत 13.85 टीएमसी साठा होता. (Latest Pune News)
गेल्या 48 तासात त्यात 0.67 टीएमसीची वाढ झाली. पानशेत, वरसगावसह टेमघर धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या तिन्ही धरणातील पाण्याची पातळी हळूहळू वाढत आहे. वरसगावनंतर पानशेत धरणही पन्नास टक्के भरण्याच्या मार्गावर आहे.
खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असले तरी धरणातून मुठा नदीच्या पात्रात 340 व मुठा कालव्यात 352 क्सुसेक पाणी सोडले जात आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून खडकवासलाची पाणी पातळी जवळपास 61 टक्क्यांवर आहे. सोमवारी दिवसभरात टेमघर येथे 24, वरसगाव येथे 18 व पानशेत येथे येथे 16 मिलीमीटर पाऊस पडला. खडकवासला येथे 2 मिलीमीटर पाऊस पडला.