इथे भाजप-काँग्रेसच उभे ठाकणार आमने- सामने

इथे भाजप-काँग्रेसच उभे ठाकणार आमने- सामने
Published on
Updated on

पुणे :

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात यंदाही काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यातच मुख्य लढत होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढल्यास काही जागांवर तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आरक्षणामुळे येथे फारसे बदल झालेले नाहीत. कॅन्टोन्मेंट मतदारसंघात चार प्रभाग असून, या सर्व प्रभागांत एक जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.

त्यामुळे उरलेल्या आठ जागांपैकी चार जागा महिलांसाठी, तर चार जागा सर्वांसाठी खुल्या झाल्या आहेत. प्रत्येक प्रभागातील दोन जागा आरक्षित झाल्याने, या प्रभागांत महिलांसाठीच्या दुसर्‍या जागेसाठी सोडत निघाली नाही. अनुसूचित जातीसाठीच्या चारपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या. त्यामुळे तेथील विद्यमान नगरसेविकांना संधी मिळणार आहे.

प्रभाग क्रमांक 19 (छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम – रास्ता पेठ) : मध्ये लक्षवेधी लढतीची शक्यता आहे. भाजपचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर या प्रभागातून लढणार आहेत. येथील अनुसूचित जातीसाठीच्या वॉर्डात महिलांसाठीचे आरक्षण पडलेले नाही. शिवसेनेच्या माजी नगरसेविका पल्लवी जावळे, माजी नगरसेवक अजय तायडे, भाजपच्या पाठिंब्यावर रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार येथून लढण्याची शक्यता आहे. सदानंद शेट्टीही येथूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गेल्या वेळी या भागातून निवडून आलेले दोन नगरसेवक या वेळी कसबा पेठ मतदारसंघातील अन्य प्रभागांतून लढणार आहेत.

प्रभाग क्रमांक 20 (पुणे स्टेशन – मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता) : या भागातून गेल्या वेळी काँग्रेसचे तीन आणि राष्ट्रवादीचा एक नगरसेवक निवडून आले होते. या प्रभागातील दोन जागा महिलांसाठी असून, त्यापैकी एक जागा अनुसूचित जातीसाठी आहे. आघाडी झाल्यास सर्वसाधारण जागेवर उमेदवार ठरविताना अडचणीचे ठरणार आहे. काँग्रेसचे अरविंद शिंदे, लता राजगुरू, चाँदबी हाजी नदाफ, राष्ट्रवादीचे प्रदीप गायकवाड हे चार नगरसेवक या प्रभागातील आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यास, येथे तिरंगी लढत होईल. तसेच दोन्ही नगरसेवक समोरासमोर लढण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक 21 (कोरेगाव पार्क-मुंढवा) मध्ये अनुसूचित जाती (महिला) साठी आरक्षण आहे. सर्वसाधारण गटातील दोन जागांपैकी एक जागा महिलेसाठी आहे. गेल्या निवडणुकीत या परिसरातून भाजपचे तीन आणि एक जागा त्यांचा मित्रपक्ष असलेला रिपब्लिकन पक्षाने मिळवली होती. त्यामध्ये तीन महिला आहेत. भाजपचे उमेश गायकवाड यांचेसमोर राष्ट्रवादीतर्फे कोण लढणार, याची उत्सुकता आहे. रिपब्लिकन पक्षाच्या हिमाली कांबळे या प्रभागातील आहेत. मनसेचे बाबू वागसकर येथून लढतील. या प्रभागात हडपसर मतदारसंघातील मुंढवा परिसर समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या सुरेखा कवडे येथून इच्छुक आहेत.

प्रभाग क्रमांक 27 (कासेवाडी – लोहियानगर) येथे काँग्रेसचे अविनाश बागवे यांना अनुसूचित जातीसाठीच्या जागेवर लढता येणार आहे. भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अर्चना पाटील किंवा तुषार पाटील या प्रभागातून लढतील. मनीषा संदीप लडकत, रफीक शेख हे माजी नगरसेवकही या प्रभागातून इच्छुक आहेत. या प्रभागातही लक्षवेधी लढतीची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news