

पुणे : शहरात बंद सदनिकांचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले आहे. उत्तर प्रदेशातील कुख्यात ‘सनी गँग’शी संबंधित असलेला आणि खून, खुनाचा प्रयत्न तसेच ‘गँगस्टर ॲक्ट’नुसार गुन्हे दाखल असलेल्या या सराईत गुन्हेगारांकडून पोलिसांनी 62 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहे. त्यांच्याकडून विश्रामबाग, खडक,
समर्थ पोलिस ठाण्यातील एकूण 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
आकाश सुभाष (वय 23, रा. सुंदरनगरी, दिल्ली; मूळ रा. मेरठ, उत्तर प्रदेश), जितेंद्र चतुर्वेदी (वय 32, रा. सुंदरनगरी, दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य आरोपी आकाश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर उत्तर प्रदेशातील गाजियाबाद, कोतवाली आणि इन्द्रापुरम पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न आणि ‘गँगस्टर ॲक्ट’अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत.
विश्रामबाग परिसरात जानेवारी महिन्यात एका घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी दागिने लांबविले होते. घटनेच्या तपासादरम्यान अंमलदार आशिष खरात आणि अनिस शेख यांनी शहरातील शंभरपेक्षा अधिक सीसीटीव्हींचे फुटेज तपासले. त्यावेळी आरोपींनी विश्रामबागसह शहरातील इतर भागांतही चोऱ्या केल्या असून, ते पुणे स्टेशनजवळील एका लॉजवर वास्तव्यास होते. तिथून ते परराज्यात पसार झाल्याचे समजले. दरम्यान, महिनाभरानंतर आरोपी हे पुन्हा घरफोडीच्या उद्देशाने ओंकारेश्वर मंदिर परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
त्यांनी चोरीचा माल रेल्वे स्टेशनजवळील लॉजमध्ये आणि काही माल दिल्ली-उत्तर प्रदेशात लपवल्याची कबुली दिली. पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर, अंमलदार आशिष खरात, अनिस शेख, सचिन अहिवळे कैलास डुकरे, झाकीर मणियार, शिवदत्त गायकवाड यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे.