

चंद्रकांत मोकाटेे
शिवसेनेचे धडाडीचे नेते, लढवय्या शिवसैनिक, जिवाला जीव देणारा माणूस, फटकळ पण दिलदार मित्र अशी चंद्रकांत मोकाटे यांची ओळख. शिवसेनेचे शाखाप्रमुख, नगरसेवक, उपमहापौर ते कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार ही त्यांच्या राजकीय वाटचालीची चढती कमान... आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण, खचून जाईल तो शिवसैनिक कसला. नव्या उमेदीने काम करून मोकाटे यांनी नगरसेवक पदावर आपली मोहोर उमटवलीच... त्यांच्या या संघर्षपूर्ण वाटचालीची गोष्ट त्यांच्याच शब्दांत...
कोथरूडमधील शिवसेनेची पहिली शाखा माझे चुलते किसनराव मोकाटे यांनी स्थापन केली. त्यानंतर 1987 ला कोथरूडच्या शाखाप्रमुख पदाची सूत्रे माझ्याकडे आली. शिवसेनेच्या वतीने विविध कामांचा पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी प्रसंगी लढेही देत होतो, त्यामुळे शाखाप्रमुखाचे नाव चांगलेच चर्चेत आले होते. अशात 1992 ची महापालिकेची निवडणूक लागली. कोथरूड गावठाणच्या वॉर्डमधून मी इच्छुक होतो, परंतु वॉर्ड महिलेसाठी राखीव झाल्याने ही संधी हुकली. तरीही शाखाप्रमुख म्हणून शिवसेनेची कामे सुरूच होती. 1997 च्या निवडणुकीतही कोथरूड गावठाण पुन्हा एकदा महिलांसाठी राखीव झाला. त्यावेळी मी गुजरात कॉलनीच्या वॉर्डातून निवडणूक लढवावी, असे आदेश तत्कालीन शिवसेनेचे नेते राज ठाकरे यांनी दिले. त्या वेळी काही तत्कालीन कारणांमुळे शिवसेना बॅकफूटवर होती. शिवसेना- भाजप युतीही नव्हती. अशात राजसाहेबांचा आदेश म्हटल्यावर मला निवडणूक लढविणे क्रमप्राप्त होते. कोथरूड गावठाणमध्ये माझे नात्या-गोत्याचे संबंध होते. शिवसैनिक म्हणून मी घराघरांत पोहोचलो होतो. परंतु, गुजरात कॉलनीत माझा तितकासा संपर्क नव्हता. सागर कॉलनी, नवभूमी, कचरा डेपो या वॉर्डाची रचना नव्यानेच झालेली होती. त्यामुळे परिश्रम घेऊनही अटीतटीच्या लढतीत दामुशेठ कुंबरे यांच्याकडून मला पराभव पत्करावा लागला. आमच्या पॅनेलमधून लढणाऱ्यांच्या पदरीही निराशाच आली होती.
निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही निकालाच्या दिवशीच मी मतदारसंघातून आभार यात्रा काढली. जे मतदार आपल्या पाठीशी उभे राहिले होते, त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी केलेल्या या गाठीभेटीच्या उपक्रमाचा मला पुढे खूपच फायदा झाला. ज्यांच्या घरी मी आभार मानायला जात होतो, तेथे माझे विजयी झाल्याप्रमाणे औक्षण करून स्वागत व्हायचे. कित्येकांना तर माहितही नव्हते की मी पराभूत झालो आहे. त्यांना जेव्हा ते समजे तेव्हा त्यांना खूप वाईट वाटे. नंतर त्यांच्या या सहानुभूतीचे बळ सदैव माझ्या पाठीशी राहिले.
पराभवानंतरही माझा जनसंपर्क कमी झालेला नव्हता. सर्व ग््राामस्थांशी माझा उत्तम संपर्क होता. त्यामुळे 2000 साली म्हातोबा मंदिर जीर्णोद्धाराची जबाबदारी त्यांनी माझ्यावरच सोपविली. लोकवर्गणीच्या माध्यमातून वर्षभरातच आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार व सभामंडपाच्या नूतनीकरणाचे काम केले. त्या वेळी बिल्डर लॉबीकडून नैसर्गिक ओढे- नाले बुजविण्याचा सपाटा सुरू होता. नैसर्गिक ओढ- नाले बुजविल्याचे परिणाम काय होतील हे लक्षात घेऊन मी त्याविरुद्ध मोठे आंदोलन उभे केले. ओढ्यात बसून केलेल्या या आंदोलनाला त्यावेळी माध्यमांनीही जोरदार प्रसिद्धी दिली. त्यामुळे निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही या ना त्या कारणाने मी सतत चर्चेत राहिलो. अशात महापालिकेची 2002 ची निवडणूक जाहीर झाली. शिवसेनेचे तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रभागातून माझी उमेदवारी जाहीर केली. माझ्यासोबत होते श्याम देशपांडे आणि कल्पनाताई मुंडे. गेली पाच वर्षे अविरतपणे केलेल्या कामाची पोचपावती मला या निवडणुकीत मिळाली. माझ्याबरोबरच माझे सहकारीही मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. नगरसेवकपदाच्या पाच वर्षांच्या कालावधीत वॉर्डात धडाडीने विकासकामे केली. नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडविण्यावर माझा भर होता. बेधडक स्वभावामुळे प्रशासनही वचकून होते. नागरिकांची कामे झटपट होऊ लागल्याने त्यांच्याकडून कौतुक होऊ लागले होते. त्याच जोरावर 2007 मध्येही पुन्हा संधी मिळाली. या वेळी करिष्मा सोसायटी, राहुलनगर, तेजस सोसायटी, कोथरूड या नव्याने निर्माण झालेल्या प्रभागातून विजयी झालो.
त्या वेळची परिस्थिती काही वेगळीच होती. परस्परांविरुद्ध निवडणूक लढवित असलो तरी त्या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात होत असत. 2007 च्या निवडणुकीत काँग््रेासचे उमेदवार काळुरामशेठ भुजबळ यांना पक्षाने दिलेला एबी फॉर्मच त्यांच्याच पक्षातील एका इच्छुकाने लांबविला. मुदतीत एबी फॉर्म देता न आल्याने भुजबळ यांना पक्षचिन्ह मिळू शकले नाही. त्यावेळी त्यांना त्यांच्या पक्षाचे चिन्ह दिले जावे, यासाठी मी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशीच भांडण केले होते.
त्या वेळचा काळच वेगळा होता. कार्यकर्त्यांना फक्त चहापान आणि जेवण द्यावे लागायचे, इतर कसलीही अपेक्षा नव्हती. मतदारही आपल्या दैनंदिन अडचणी सोडवणारा कोण, सहज उपलब्ध असणारा, कोण हे पाहून मतदान करायचे. आमिषे नाही, डी. जे. नाही, मोठ्या मोठ्या देणग्या नाही, प्रलोभनेही नाहीत, तरीही मतदार जणू आपण स्वतःच उमेदवार आहोत या भावनेने निवडणूक हातात घेत व आपल्या उमेदवारांना निवडून देत होते.
(शब्दांकन : सुनील कडूसकर)