

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक मताला विशेष महत्त्व असल्याने कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपली संघटनात्मक ताकद पूर्ण क्षमतेने वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्षाने बूथस्तरावरील कार्यकर्त्यांना बोगस तसेच दुबार मतदानावर काटेकोर लक्ष ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेकदा अत्यल्प मतांच्या फरकाने निकाल लागतो. ही बाब लक्षात घेऊन भाजपने प्रत्येक मतदान केंद्रावर सतर्कता राखण्यावर विशेष भर दिला आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह राहावी, यासाठी बूथ कार्यकर्त्यांनी मतदान सुरू होण्यापासून ते शेवटपर्यंत सजग राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पक्षाच्या सूत्रांनुसार, मतदार यादीतील नोंदी, ओळखपत्रांची तपासणी, तसेच संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी बूथ कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली आहे. बोगस किंवा दुबार मतदानाचा संशय आल्यास संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास तत्काळ बाब मांडावी आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार तक्रार नोंदवावी, असेही सांगण्यात आले आहे. निवडणूक आचारसंहिता पाळत कोणताही दबाव, वाद किंवा गोंधळ निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांनी संयम राखून, नियमांच्या चौकटीत राहून काम करावे, असा पक्षाचा आग््राह आहे.
मतदानवाढीसाठी प्रयत्न करणार
महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत आहे. शहरात एकूण 4 हजार 11 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर भाजपने बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांची वेगळी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तसेच उमेदवारांचे कार्यकर्ते देखील मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार आहे. हे बूथ प्रमुख सकाळी 6 वाजल्यापासून मतदान संपेपर्यंत मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत.
त्यांच्यासाठी पक्षाकडून व उमेदवारांकडून सकाळी चहा व नाश्ता, दुपारी 1 वाजता जेवण आणि सायंकाळी 5 वाजता चहा अशी व्यवस्था केली. मतदान केंद्रावर आवश्यक साहित्य देखील पुरवण्यात आले आहे. मतदान वाढीसाठी देखील हे कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत. वृद्ध नागरिकांना मतदान केंद्रांवर आणण्याची मोठी जबाबदारी देखील पक्षाने त्यांना दिली आहे.