

Ajit Pawar NCP Baramati clash
बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणूक पार पडल्यानंतर मतदानाची टक्केवारी कमी का झाली, या विषयावर आयोजित बैठकीत शहरातील राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची मोठी चर्चा सध्या शहरात सुरू आहे. खा. पार्थ पवार यांनी यात मध्यस्थी केल्याचे बोलले जात आहे. पक्षाकडून मात्र याबाबत हात वर करण्यात आले आहेत.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले. या वेळी मतदानाचा टक्का का घसरला, या विषयावरून आयोजित बैठकीत हा प्रकार घडला. बारामतीतील दोन नगरसेवकांमध्ये जुंपल्याची माहिती समोर येत आहे. यासह एका माजी नगरसेवकानेही विद्यमान पदाधिकाऱ्यासोबत वाद घातला.
ज्या नगरसेवकांमध्ये वाद झाला, त्यातील एक नगरसेवक कायम वादात असणारा आहे. नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच ते नको त्या अवस्थेत होते. तेव्हा देखील त्याच्यासंबंधी शहरभर मोठी चर्चा सुरू झाली होती.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा मतदानानंतर आढावा घेतला गेला. त्यात मतदान कमी का झाले, या विषयावर चर्चा सुरू असताना दोघे एकमेकांना भिडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. खा. पार्थ पवार यांनीच ही बैठक बोलावली होती. हा वाद नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबतची अधिक माहिती बाहेर आली नाही. पण मतदानाच्या टक्केवारीवरूनच तो सुरू झाल्याचे समजते.
या घटलेल्या मतदानाची जबाबदारी शहरात सध्या कोणत्याही नगरसेवकाला नको आहे. उलट जो तो मी पक्ष नेतृत्वाच्या किती जवळचा आहे, हे सांगण्याच्या प्रयत्नात आहे. अजितदादांच्या निधनापूर्वीच काही दिवस शहर राष्ट्रवादीत खांदेपालट केला गेला. त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. खा. पार्थ यांनी यापुढील काळात बुथ कमिट्या अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवणे, या बाबींवर बैठकीत चर्चा केल्याचे सांगण्यात आले.