

पुणे: प्रसिद्ध टेनिसपटू डॅनियल मेदवेदेव आणि फेलिक्स ऑगर यांच्यात होणारा सामना पाहण्यासाठी दुबईला गेलेले पुण्यातील प्रांजल व हर्षवर्धन खुर्द हे वास्तुविशारद दाम्पत्य आखातातील युद्धामुळे दुबईत अडकून पडले आहेत. परंतु, सुदैवाने दुबईस्थित पुणेकर किरण बेंडे त्यांच्या मदतीला धावून गेल्याने त्यांना आधाराबरोबरच पाहुणचारही मिळाला आहे.
हर्षवर्धन खुर्द यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना ही माहिती दिली. पुण्यातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व डॉ. खुर्द फर्टिलिटी सेंटरचे संचालक डॉ. संजीव व साधना खुर्द यांचे हर्षवर्धन हे कनिष्ठ चिरंजीव. त्यांना टेनिसची आवड असून, ते स्वतःही टेनिस कोच आहेत.
दुबई चॅम्पियनशिप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियन टेनिसपटू डॅनियल मेदवेदेव व कॅनेडियन टेनिसपटू यांच्यात होणारा सामना पाहण्यासाठी ते गेल्या शुक्रवारी (27 फेबुवारी) दुबईला गेले होते. सामना पाहिल्यावर दुसऱ्या दिवशी जगप्रसिद्ध वास्तुविशारदांनी अधू धाबीत उभारलेल्या काही इमारती पाहण्यासाठी ते आबुधाबीत गेले होते.
तेथील ग््राँड मॉस्क पाहत असतानाच त्यांना दुबईतील हॉटेल व्यवस्थापकाने फोन करून धोक्याची कल्पना दिली व दुबईत परतु नका, असे कळविले. तथापि, एका टॅक्सीचालकाच्या मदतीने ते परतले. ते स्पाईस जेटच्या विमानाने भारतात परतणार होते. परंतु, ते विमान रद्द झाल्याने त्यांनी एमिरेट्सचे तिकीट घेतले. त्यानंतर एमिरेट्सची विमानेही सात दिवसांकरिता रद्द झाल्याचे समजले, त्यामुळे हे तरुण दाम्पत्य निराश झाले.
आता काय करायचे? या चिंतेत असतानाच किरण बेंडे या दुबईस्थित पुणेकराने त्यांच्याशी संपर्क साधला. बेंडे यांना पुण्यातील एका नातेवाइकाने हर्षवर्धन व त्यांची पत्नी दुबईत अडकून पडल्याचे कळविले व त्यांना मदत करण्याची विनंती केली. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता त्यांनी हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला व लागलीच त्यांना आपल्या घरी घेऊन गेले. दुबईतील महा-हेल्पलाइनचे संचालक राहुल तुळपुळे व व्यावसायिकांच्या संघटनेचे सदस्य हर्षद पाटील यांनीही हर्षवर्धन खुर्द यांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.