

पुणे: लालचुटूक रंग, रसाळ गर अन् आंबट-गोड चवीच्या देशी सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा लहरी हवामानामुळे उत्पादन निम्म्यावर आले असतानाच हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमधील सफरचंद पहिल्यांदाच एकाच वेळी पुण्याच्या बाजारात दाखल झाले आहे. कमी आवक आणि अधिक मागणीमुळे गतवर्षीच्या तुलनेत पेटीमागे सुमारे एक हजार रुपयांची तेजी आहे. घाऊक बाजारात १० ते २५ किलोंच्या स्वरूपात दाखल होत असलेल्या सफरचंदाला २ हजार ते ४ हजार रुपये दर मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात २०० ते ३०० रुपये किलो दराने सफरचंदाची विक्री सुरू आहे.
आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी समजले जाणारे सफरचंद लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्याच पसंतीचे फळ आहे. देश-विदेशातून होणाऱ्या आवकमुळे पुण्याच्या बाजारात वर्षभर सफरचंद उपलब्ध असते. मात्र, पावसाळ्यापासून देशी सफरचंदाचा मुख्य हंगाम सुरू होतो. यंदा हंगाम वेळेत सुरू झाला असून, शिमला आणि काश्मीरमधील बागांमधून नव्या हंगामातील ताजी सफरचंदे गुलटेकडी मार्केट यार्डात दाखल होऊ लागली आहेत.
हिमाचलमधून २४ ते २५ किलो वजनाच्या दोन ते तीन हजार पेट्यांची आवक होत असून, पेटीला ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये घाऊक भाव मिळत आहे. काश्मीरमधून १० ते १३ किलो वजनाच्या चार ते साडेचार हजार पेट्या बाजारात येत असून, पेटीला २ हजार ते २ हजार ६०० रुपये भाव मिळत आहे. देशी सफरचंदाची आवक सुरू झाल्याचा परिणाम परदेशी सफरचंदाच्या दरावरही झाला आहे. परदेशी सफरचंदाच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांची घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
काश्मीरच्या नव्या लागवडीने हंगामाचे चित्र बदलले
पूर्वी हंगामाच्या सुरुवातीला हिमाचल प्रदेशातील सफरचंद बाजारात दाखल होत असे. त्यानंतर साधारण १५ ते २० दिवसांनी काश्मिरी सफरचंदाची आवक सुरू होत होती. मात्र, गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीय फलोत्पादन उपक्रमांतर्गत काश्मीरच्या समतल भागातही सफरचंदाची लागवड वाढली आहे. पूर्वी सोपीयान, पुलगाम आणि बारामुल्ला या डोंगराळ भागांत प्रामुख्याने सफरचंदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. आता गांधरबल, अनंतनाग आणि बडगाम या भात उत्पादक पट्ट्यातही लागवड वाढली आहे. या भागातील सफरचंद डोंगराळ भागाच्या तुलनेत लवकर तयार होत असल्याने हिमाचल आणि काश्मीरच्या सफरचंदाची आवक एकाच वेळी होत आहे. यापुढे दर वर्षी असेच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
यंदा शिमला आणि काश्मीरमधील गाला सफरचंद एकाच वेळी बाजारात आले आहे. हंगाम वेळेत सुरू झाला असला तरी लहरी हवामानामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. आवक कमी आणि मागणी चांगली असल्याने गतवर्षीच्या तुलनेत पेटीमागे सुमारे एक हजार रुपयांनी भाव अधिक आहेत. पुढील काळात आवक वाढण्याची अपेक्षा आहे.
शिवजित सुयोग झेंडे, अडतदार, श्री गुरुदेव दत्त फ्रूट एजन्सी.