

पुणे: लोहगावमधील जुन्या विमानतळ टर्मिनलच्या नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू असून, हे काम पूर्ण झाल्यावर जुने आणि नवीन टर्मिनल एकमेकांना जोडले जातील. त्यामुळे पुणे विमानतळाची भव्यता तर वाढेलच, पण अधिकचे 14 चेक- इन काउंटर वाढणार आहेत. त्यामुळे विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे विमानतळावर प्रवाशांना सुखद अनुभव देण्यासाठी आगामी काळात लवकरच हे मोठे बदल करण्यात येत आहेत, असे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दैनिक ’पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना ही माहिती दिली. (Latest Pune News)
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जुने टर्मिनल नवीन टर्मिनलला जोडल्यानंतर चेक- इन काउंटरमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. जुन्या टर्मिनलमध्ये अतिरिक्त 14 चेक- इन काउंटर वाढवण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना आता चेक- इनसाठी जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागणार नाही, त्यांचा वेळ वाचेल आणि प्रवासाचा अनुभव अधिक सोयीचा होईल.
चारचाकी वाहनांसाठी नवा रस्ता बनवला जाणार
जुन्या टर्मिनल परिसरातील सीआयएसएफ कार्यालयाचे स्थलांतर नवीन इमारतीत केले आहे. याचबरोबर जुन्या टर्मिनलसमोरील विमान कंपन्यांचे तिकीट काउंटर हलवण्यात आले असून, काउंटर असलेल्या इमारती जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आल्या आहेत.
समोर असलेल्या इतर इमारतीही लवकरच पाडून हा परिसर संपूर्णपणे मोकळा केला जाईल. या मोकळ्या जागेत चारचाकी वाहनांच्या येण्या- जाण्यासाठी नवा रस्ता बनवला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होईल, असेही विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी यावेळी सांगितले.
पुणे विमानतळावर प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जुने आणि नवीन टर्मिनल जोडले गेल्याने विमानतळाची क्षमता वाढेल आणि प्रवाशांना जलद सेवा मिळेल. विशेषतः 14 अतिरिक्त चेक- इन काउंटरमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि त्यांना अधिक आरामदायक प्रवासाचा अनुभव घेता येईल.
- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ
पुणे विमानतळावर सुरू असलेले जुने टर्मिनल नूतनीकरणाचे हे काम पूर्ण झाल्यावर, आमच्यासारख्या पुणेकरांना आणि इतर प्रवाशांना आणखी भव्य आणि अत्याधुनिक विमानतळ मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- आबा बाबर, प्रवासी