पुणे: मान्सूनने यंदा लवकर हजेरी लावल्याने रंगाने लालचुटूक अन् तुरट-गोड चवीचे कच्चे खजूरही बाजारात दाखल होऊ लागले आहेत. पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाल्याने रविवारी मार्केट यार्डातील फळबाजारात गुजरात येथून तब्बल तीन टन खजुराची आवक झाली. त्याच्या दहा किलोला 300 ते 600 रुपये दर मिळाला, तर किरकोळ बाजारात 100 ते 120 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात गुजरात येथील कच्छ आणि भूज भागांतून दररोज तीन टन कच्चे खजूर दाखल होत आहेत. यंदाच्या वर्षी मान्सूनचे लवकर आगमन झाल्याने फळांसाठी पोषक वातावरण तयार झाले. खजूर लवकर परिपक्व झाल्याने एरवीच्या तुलनेत दहा दिवस अगोदर हंगाम सुरू झाला आहे. (Latest Pune News)
खजुराचा दर्जाही चांगला असून, त्याला जिल्हा, राज्यासह परराज्यांतूनही मागणी आहे. सद्य:स्थितीत हंगामाची सुरुवात आहे. मात्र, पावसाचा जोर वाढल्यास खजुराचा हंगाम लवकर गुंडाळण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले.
कच्च्या खजुराचा हंगाम दोन महिने राहतो. सद्य:स्थितीत हंगामास सुरुवात झाली आहे. यंदा मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे फळांसाठी पोषक वातावरण तयार होऊन ती लवकर परिपक्व झाली. परिणामी, एरवीच्या तुलनेत दहा दिवस अगोदर फळे बाजारात दाखल होत आहेत. येत्या काही दिवसांत आवक वाढून दरात आणखी घट होईल.
- सतीश वैरागकर, व्यापारी, मार्केट यार्ड