सासवड: भागवत एकादशीनिमित्त संत सोपानदेवांच्या दर्शनासाठी रविवारी (दि. 22) भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सोमवारी (दि. 23) सकाळी 11 वाजता हजारो वारकर्यांच्या उपस्थितीत संत सोपानदेव महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात होईल. सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त अॅड. त्रिगुण गोसावी यांनी दिली.
रविवारी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळ्याचे लाखो वारकर्यांसमवेत सासवड येथे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आगमन झाले. भागवत एकादशीनिमित्त मंदिरात पहाटे काकड आरती व समाधीची महापूजा करण्यात आली. सकाळी 11 वाजता पंचक्रोशीतील भाविकांचे हरिपाठाचे भजन झाले. (Latest Pune News)
सासवडमधील महाजन परिवारातर्फे मंदिरात येणार्या हजारो भाविकांना उपवासानिमित्त भगरीचा भात आणि शेंगदाणे आमटीचा प्रसाद वाटप केला. तालुक्यातील विविध भाविकांच्या वतीने भाविकांना केळी, राजगिरा पाकिटे, चहा, दूध वाटप केले. संत सोपानदेव देवस्थानच्या वतीने पालखी व रथला झळाळी देण्यात आली.
सोपानकाका बँकेच्या वतीने रथाला नवीन झळाळी देण्यात आली असून पादुका ठेवण्यासाठी सिंहासन नवीन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे सोपानकाका बँकेच्या वतीने संपूर्ण पालखी मार्गावर रथाला फुलांची सजावट करण्यात येणार आहे.
चांगावटेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान
श्री संत सोपानदेव महाराज पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान सुरू झाल्यानंतर काही वेळातच याच परिसरातून श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. सोमवारी रात्रीचा मुक्काम श्री पारेश्वर मंदिर पारगाव मेमाणे येथे होईल, अशी माहिती सोहळाप्रमुख ह.भ.प. जनार्दन (आप्पा) वाबळे यांनी दिली.