जुन्या-नव्या टर्मिनल चेक-इन काउंटर्सची वाढणार संख्या
वेटिंग पीरिअडही होणार कमी; हवाई प्रवासाला मिळणार वेग
पुणे : पुणे विमानतळावरील जुन्या टर्मिनलच्या नूतनीकरणाचे काम डिसेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे वर्षअखेरीपर्यंत पुणे विमानतळाचे रुपडे पालटणार आहे.
विमानतळाचे क्षेत्र यामुळे वाढणार असून, हवाई प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. विमानतळावरील जुन्या टर्मिनलचे नूतनीकरण आणि जुन्या-नवीन टर्मिनलच्या अंतर्गत जोडणीच्या कामामुळे पुणे विमानतळ टर्मिनलचे क्षेत्र वाढणार आहे. तसेच, 14 नवीन चेक-इन काउंटर्सची भर पडणार असल्याने प्रवाशांना तत्काळ आतमध्ये प्रवेश मिळेल आणि प्रवेशासाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी कमी होईल. हे सर्व नूतनीकरण सुरक्षा मानकांनुसार केले जात असून, वरिष्ठपातळीवरील आवश्यक परवानग्या मिळवल्या जातील. वर्षअखेरपर्यंत जुने टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत येईल, असे पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
दोन्ही टर्मिनल जोडल्यामुळे प्रवाशांना एका टर्मिनलवरून
दुसर्या टर्मिनलवर जाणे अधिक सोईस्कर होईल.
एकात्मिक व्यवस्थापनामुळे विमानतळाच्या एकूण कामकाजात आणि प्रवाशांच्या हालचालींमध्ये अधिक कार्यक्षमता येईल.
विमानतळाची जागा प्रभावीपणे वापरली जाईल, त्यामुळे उपलब्ध संसाधनांचा चांगला उपयोग होईल.
एकत्रित झाल्यामुळे चेक-इन, सुरक्षा तपासणी आणि बोर्डिंग गेट्सच्या सेवा अधिक सुव्यवस्थित होतील.
प्रवाशांना कमीत कमी वेटिंगसह सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.
प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जुन्या टर्मिनलच्या नूतनीकरणाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जुन्या टर्मिनलचे नूतनीकरण करून ते नव्या टर्मिनलला जोडले जाणार आहे. हे झाल्यामुळे प्रवाशांना एक आधुनिक आणि कार्यक्षम अनुभव मिळेल. यामुळे त्यांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सुखकर होईल. या प्रकल्पामुळे पुणे विमानतळाची क्षमता वाढणार असून, ते अधिक सक्षमपणे प्रवाशांची वाढती संख्या हाताळू शकेल.
- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ