

पुणे: भारतीय हवाई दलाच्या सहकार्यामुळे पुणे विमानतळावर उपलब्ध झालेल्या अतिरिक्त स्लॉटचा पूर्ण क्षमतेने वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्तारण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणेकरांना अधिक शहरांशी थेट हवाई संपर्क उपलब्ध व्हावा, तसेच वाढत्या प्रवासी मागणीची प्रभावी पूर्तता व्हावी, यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मोहोळ म्हणाले, की इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर, स्पाइसजेट, फ्लाय ९१, स्टार एअर आणि अलायन्स एअर या विमान कंपन्यांकडून सध्या पुणे विमानतळावरून सेवा दिली जात आहे. वाढीव स्लॉट उपलब्ध झाल्यानंतर सर्व विमान कंपन्यांना त्याची माहिती देण्यात आली असून, त्यांच्या मुख्यालयांशी समन्वय साधून पुण्यातून नवीन शहरांसाठी उड्डाणे सुरू करणे, तसेच विद्यमान मार्गांवरील उड्डाणांची संख्या वाढविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
स्लॉटची संख्या २२० वरून २३५
मोहोळ यांनी १९ मार्च २०२५ रोजी भारतीय हवाई दलाकडे पुणे विमानतळावरील उड्डाण स्लॉट वाढविण्याची अधिकृत विनंती केली होती. त्या पाठपुराव्याला यश येत हवाई दलाने ३० मे २०२५ रोजी पुणे विमानतळावरील दैनंदिन विमान हालचालींची कमाल मर्यादा २२० वरून २३५ पर्यंत वाढविण्यास मान्यता दिली. या निर्णयामुळे पुणे विमानतळाच्या विस्तारासाठी आणि नवीन उड्डाणांसाठी महत्त्वाचा मार्ग मोकळा झाला.
पुणे विमानतळावर २१४ विमान हालचालींची नोंद
पुणे विमानतळावर २ ऑगस्ट २०२६ रोजी १०७ आगमन आणि १०७ प्रस्थान अशी एकूण २१४ विमान हालचाली नोंदविण्यात आल्या. त्या दिवशी पुणे विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मिळून ३४ शहरांशी हवाई संपर्क उपलब्ध होता. दिल्लीसाठी सर्वाधिक १९, बंगळुरूसाठी १७, चेन्नईसाठी ७, हैदराबाद व अहमदाबादसाठी प्रत्येकी ५, तर गोव्यातील मोपा विमानतळासाठी ४ उड्डाणे झाली.
दुबई-बँकॉक मार्गावरील सेवा सुरू
सध्या इंडिगो आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांनी दुबई आणि बँकॉक मार्गावरील सेवा पुन्हा सुरू केल्यामुळे वाढीव स्लॉटचा वापर लक्षणीयरीत्या वाढला आहे. आगामी काळात प्रवासी मागणी आणि विमान कंपन्यांच्या नियोजनानुसार आणखी नवीन देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
पुणे हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असून, आयटी, उद्योग, शिक्षण, संरक्षण आणि पर्यटन क्षेत्रामुळे हवाई प्रवासाची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे विमानतळाची क्षमता अधिक प्रभावीपणे वापरणे, नवीन उड्डाणांना चालना देणे आणि प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भविष्यातही पुण्याची हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक तो सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल.
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री