

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर आणि जिल्ह्यात असलेल्या पेट्रोल पंपांवर नोझलचे थ्रेड लूज ठेवून ग्राहकांना देण्यात येणार्या इंधनामध्ये मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याचे वृत्त दैनिक 'पुढारी'ने प्रसिद्ध केल्यानंतर वैधमापनशास्त्र विभागातील अधिकारी खडबडून जागे झाले आणि त्यांनी शहर जिल्ह्यातील पंपांची तपासणी सुरू केली. पंपांची संख्या 550 आहे. मात्र, तपासणी केवळ 76 पंपांचीच झाली. ही तपासणी केवळ देखावा असून, मोहीम राबविली असे कागदोपत्री दाखविण्याचे तंत्र या अधिकार्यांनी अवलंबिले असल्याची बाब पुढे आली आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात सुमारे 550 पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी बहुतांश पेट्रोल पंपचालक ग्राहकांना पेट्रोल देताना लिटरमागे किमान 15 ते 20 मिली इंधन कमी देत असल्याचे अनेक गेल्या काही महिन्यांपासून नागरिक तक्रारी करत आहेत. कमी पेट्रोल दिल्यामुळे ग्राहक आणि पेट्रोल देणारे पंपांवरील कर्मचारी यांच्यामध्येही वाद होत आहेत. मात्र, या वादाची किंवा ऑनलाइन तक्रारी केल्यानंतरही वैधमानपनशास्त्र विभागातील अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्याचे दिसून आले आहे. वास्तविक पाहता कामाच्या सोयीसाठी वैधमापनशास्त्र विभागाने शहर जिल्ह्याचे चार जिल्ह्यांत रूपांतर केले आहे. मात्र, तपासणी निरीक्षक आणि पेट्रोल पंपचालक यांच्यामध्ये असलेल्या आर्थिक साटेलोट्यामुळे पंपाच्या आतमधील नोझलचे 'थ्रेड' थोडे जरी लूज केले तर लिटरमागे किमान 15 ते 20 मिली इंधन कमी येते.
पंट्रोल पंपामधून होत असलेल्या इंधन चोरीबाबत पुणे जिल्ह्याच्या चारही कार्यालयांतर्गत मोहीम राबविण्यात आली. सुमारे 76 पंपांची तपासणी निरीक्षकांनी केली. त्यांनी दिलेल्या अहवालात शहर जिल्ह्यातील एकाही पंपावर पेट्रोल चोरी होत नसल्याचा शेरा दिला आहे. वास्तविक पाहता वैधमापनशास्त्र विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सगळ्या ठिकाणी निरीक्षक पोहोचू शकत नाहीत.
– सुरेश चाटे, सहनियंत्रक (प्रभारी), वैधमापनशास्त्र, पुणे विभाग.
हेही वाचा