पुणे: कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील (कात्रज) गाळा काढून पक्ष्यांच्या अधिवासासाठी कृत्रिम बेट उभारण्याचे काम सुरू होते. मात्र बेट उभारण्यासाठी आरसीसी फाउंडेशन, दगडांचे पीचिंग करून मुरमाचा भर देणे आवश्यक होते. मात्र हे न करताच तलावाच्या मध्यभागी गाळा साठवला जात होता.
याबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने बेट उभारण्याच्या कामाला तुर्तास स्थगिती दिली आहे. आता केवळ गाळ बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनाने या तलावातील गाळ काढण्याचे काम जलसंपदा खात्याच्या यांत्रिकी विभागाला दिले आहे. मलनिस्सारण विभागाचे या कामावर नियंत्रण आहे. गाळ काढून तलावाच्या कडेला पक्ष्यांच्या अधिवासासाठी कृत्रिम बेट तयार करण्याचे नियोजन आहे.
यासाठी आरसीसी फाउंडेशन, दगडी पीचिंग आणि मुरमाचा भरावा देणे गरजेचे आहे. मात्र, हे काम न करताच बेट उभारण्याच्या नावाखाली तलावातून काढलेला गाळ मध्यभागी टाकला जात होता. याबाबत दै. ‘पुढारी’ ‘केवळ गाळाने कृत्रिम बेट कसे उभारणार?’ या शीर्षकाखाली नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते.
त्यानंतर महापालिका प्रशासनाने कृत्रिम बेट उभारण्याच्या निर्णयास स्थगिती दिली. तलावातील गाळ काढणे आणि बेट उभारण्याच्या कामाबाबत मलनिस्सारण आणि उद्यान विभागात दुमत असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
तलावातील संपूर्ण गाळ पाऊस पडण्याच्या आधी बाहेर काढणे आवश्यक आहे. हा गाळ बाहेर न काढल्यास तलावात जलपर्णी वाढते, पर्यायाने दुर्गंधी सुटते आणि त्याचा त्रास परिसरातील रहिवाशांना नागरिकांना होतो. त्यामुळे तलावातील गाळ काढणे गरजेचे असल्याचे मत गजराज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष महेश धूत यांनी व्यक्त केले.
माजी नगरसेवक युवराज बेलदरे म्हणाले की, पावसाळ्याच्या तोंडावर तलावात बेट उभारण्याच्या नावाखाली एका ठिकाणाहून काढलेला गाळ दुसर्या ठिकाणी टाकणे आणि नंतर बेट उभारण्याचा कामाला स्थगिती देण्याची वेळ येणे ही मलनिस्सारण विभागावरील नामुष्की नाही का? कृत्रिम बेट उभारण्यापूर्वी अभ्यासपूर्ण नियोजन होणे आवश्यक आहे. तलावाच्या मध्यभागी टाकलेला गाळ पुन्हा बाहेर काढण्यासाठी अधिक निधी, श्रम आणि वेळ खर्च होणार आहे. यामुळे या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
गाळ बाहेर काढताना काळजी घेणे गरजेचे आहे. हा गाळ महापालिका प्रशासनाने बाहेर काढून द्यायला हवा. प्राणी किंवा पर्यटकांना वाहनांचा त्रास होणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. - डॉ. राजकुमार जाधव,
संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, कात्रज
तलावातून गाळ बाहेर काढण्याचे आता निश्चित झाले आहे. हा गाळ घेऊन जाण्याचे आवाहन शेतकर्यांना करण्यात येईल. त्यानंतर गाळ बाहेर काढण्यास सुरूवात होईल. पावसाळ्या आधी तलावातील सर्व गाळ बाहेर काढण्यात येईल.
- संतोष तांदळे, अधिक्षक अभियंता, मलनिस्सारण विभाग, महापालिका