

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह तिघांविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बनावट दस्त तयार करून तो खरा असल्याचे भासवून सादर केल्याच्या आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार रौनक जैन (वय 38, रा. सूर्यप्रकाश अपार्टमेंट, मार्केट यार्ड), दीपक मानकर (वय 67, रा. जलसा सोसायटी, विधी महाविद्यालय रस्ता) आणि शंतून सॅम्युअल कुकडे (वय 53, रा. तिरुपती अपार्टमेंट, नाना पेठ) या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Latest Pune News)
हा प्रकार ऑगस्ट 2024 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडला आहे. दरम्यान, परदेशी तरुणीला आश्रय देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी शंतून कुकडे याच्यासह समर्थ पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकडे याचा निकटवर्तीय रौनक जैन नावाच्या व्यक्तीच्या खात्यातून मानकर पिता- पुत्रांच्या खात्यात पावणेदोन कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले होते. कुकडे याच्या खात्यात कोट्यवधी रुपये आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ही रक्कम 40 ते 50 जणांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले.
त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास केला. जैन, मानकर, कुकडे यांनी आपआपसामध्ये संगनमत करून, आपली आर्थिक उलाढाल लपविण्यासाठी आणि ती कायदेशीर असल्याचे दाखविण्यासाठी बनावट दस्त तयार केला.
तसेच, चौकशीत तो दस्त खरा असल्याचे भासवून हजर केला, असे पोलिस निरीक्षक गित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी याप्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक पाटील तपासकरत आहेत.
शंतनु कुकडेच्या संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना, रेड हाऊस फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहासंदर्भात आम्हाला माहिती मिळाली होती. त्याच्या पुढील तपासात एक वेगळा अँगल दिसून आला. त्याबाबत हा गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातील हा प्रकार आहे. यातील कागदपत्रे बनावट तयार केल्याचे समोर आले आहे. त्यामध्यील स्टॅम्प पेपरवरील मूळ क्रमांक, शिक्के, सही हे मागील तारखेचे आहेत. तो स्टॅम्प कोषागारातून नंतर घेतला असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
- संदीपसिंग गिल, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक