

पुणे: आंबेगाव परिसरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती आणि त्याच्या प्रेयसीवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. माधुरी विकास कोकणे (वय 34, रा. अष्टविनायकनगर, आंबेगाव पठार) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी पती विकास कोकणे (वय 36) आणि अर्चना अहिरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विकास याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत माधुरी यांचा भाऊ आशिष आलगट (वय 22, रा. धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 ते 10 मे पर्यंतच्या कालावधीत घडला आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरीला तिच्या पतीचे अर्चना हिचेबरोबर असलेले विवाहबाह्य संबंध समजले होते. तिने पतीला याचा जाब विचारला, तेव्हा त्याने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, ‘व्यवसायासाठी माहेरून दहा लाख रुपये आणून दे, मी तिचा नाद सोडतो,’ असे सांगितले.
तर अर्चनाने माधुरीला वारंवार फोन करून ‘तू तुझ्या नवर्याला सोडून दे, मला त्याच्याशी विवाह करायचा आहे,’ असे म्हणत मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून माधुरीने शनिवारी (दि.10) राहत्या घरी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर कदम करत आहेत.