वाल्हे: पुरंदर तालुक्यातील दक्षिण भागात माहुर, परिंचे, वीर, हरगुडे, हरणी, वाल्हे, जेऊर, लपतळवाडी या परिसरांत मोठ्या प्रमाणात फुलशेती केली जाते. परिंचे (ता. पुरंदर) येथील कांदा उत्पादक अरविंद ऊर्फ बाळासाहेब गंगाराम दुधाळ यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून तीस गुंठे क्षेत्रावर मल्चिंग पेपर व ठिंबक सिंचनाद्वारे झेंडूशेती फुलवली. तीन महिन्यांत त्यांना सव्वादोन लाखांचे उत्पन्न मिळाले. दसर्याच्या काळात त्यांना मोठ्या आर्थिक उत्पन्नाची अपेक्षा आहे.
अरविंद दुधाळ यांना फुलशेती करताना आई शांताबाई, पत्नी राणी दुधाळ यांनी मोलाची साथ दिली. शेतीबरोबर दुधाळ हे हंगामी वाहतूक व बारदाना व्यवसाय करतात. झेंडूशेतीबाबत बाळासाहेब दुधाळ यांनी सांगितले की, इतर पिकांच्या तुलनेत फुलशेती फायदेशीर ठरते. झेंडूपिकानंतर कांदापीक घेतले जाते. (Latest Pune News)
झेंडूचा बेवड कांद्यासाठी पोषक असून, कांदा जोमाने येतो. त्यामुळे ज्या शेतात कांद्याचे पीक करायचे आहे, त्या शेतात आधी झेंडूपीक दरवर्षी करतो. लागवडीनंतर दोन महिन्यांत उत्पादन सुरू झाले. लग्नसराईच्या काळात हमखास बाजारभाव मिळतो. त्यामुळे पुढील पिकांसाठी भांडवल तयार होते. पाण्याचा निचरा होणार्या हलक्या ते मध्यम जमिनीत झेंडूचे पीक जोमदार येते.
यंदा दिग्विजय भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीने फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी हरणी (ता. पुरंदर) परिसरातील शेतजमिनीची नांगरट केली. दोनवेळा कुळवाच्या पाळ्या टाकून जमीन तयार केली. पाच ट्रॉली शेणखत टाकले. तीन फूट रुंदीची सरी काढून त्यावर ठिंबक सिंचन व मल्चिंग पेपर अंथरून झेंडूची लागवड केली. 30 गुंठ्यांत चार हजार रोपांची लागवड केली.
मल्चिंग पेपर वापरल्याने आंतर मशागतीचा खर्च वाचला. पिकांवर रोगराई कमी प्रमाणात आली. ठिंबक सिंचनाचा वापर केल्यामुळे उन्हाची तीव्रता असल्याने जमिनीत ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत झाली. ठिंबक सिंचनाद्वारे विद्राव्य खते देण्यात आल्याने रासायनिक खतांवरील खर्च कमी प्रमाणात झाला, असे अरविंद दुधाळ यांनी सांगितले.
झेंडूवर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, लालकोळी यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे दोनवेळा कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी केली. रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी काळजी घेतल्यामुळे पिकाची जोमदार वाढ झाली. सुरुवातीला लागलेली कळी व शेंडे खुडून टाकल्याने मोठ्या प्रमाणात फुटवे फुटून झाडाची चांगली वाढ झाली.
पहिला तोडा पन्नास दिवसांत सुरू झाला. त्या वेळी शंभर रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला. फुलांची तोडणी सोपी असली, तरी माल जास्त प्रमाणात असल्यामुळे रोज तोडणी करावी लागते. तोडलेली फुले मोकळ्या जागेत ठेवून हार बनविण्यासाठी प्रतवारी करून पुणे येथील गुलटेकडी मार्केटमध्ये पाठवली जातात. आत्तापर्यंत नऊ टन उत्पादन मिळाले आहे. चालू बाजारभाव कमी असले तरी नवरात्र, दसरा, दिवाळीत झेंडूला मोठ्या प्रमाणात मागणी असते. या वेळी झेंडू हमखास भाव खातो, असे त्यांनी सांगितले.