

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे: पावसाळा सुरू होताच पुण्यात कीटकजन्य आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्यक्षात, जून आणि जुलै महिन्यात महापालिकेकडे डेंग्यूच्या केवळ 15 रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यू ’नोटिफायेबल डिसीज’ असतानाही खासगी रुग्णालये नोंदणीस टाळाटाळ करत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
डेंग्यू, चिकुनगुनियासारख्या किटकजन्य आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने वॉर्डस्तरीय तपासण्या, धूरफवारणी मोहीम राबवली आहे. डेंग्यूच्या एलिझा चाचणीसाठी खासगी रुग्णालयांनी 600 रुपयांचा दर निश्चित केला आहे. याबाबत खासगी रुग्णालयांना नोटीसही पाठवण्यात आली आहे. रुग्णालयांनी जास्त कर आकारल्यास महापालिकेकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Latest Pune News)
किटकजन्य आजारांची माहिती देणे बंधनकारक असतानाही रुग्णांची गर्दी, मनुष्यबळाचा अभाव अशी कारणे खासगी रुग्णालयांकडून दिली जात आहेत. प्रत्येक रुग्णालयात जाऊन माहिती घेणे महापालिकेला शक्य नाही, त्यामुळे पोर्टलमध्ये रुग्णालयांनी अचूक आणि अद्ययावत माहिती भरल्यास त्यानुसार प्रतिबंधक उपाययोजना राबवणे महापालिकेला शक्य होणार आहे.
कमला नेहरु रुग्णालयातील डेंग्यू चाचणी मशीन बंद
महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय व गाडीखाना रुग्णालयात मोफत डेंग्यू चाचणीची सोय उपलब्ध आहे. मात्र, कमला नेहरु रुग्णालयातील एलिझा चाचणीचे मशीन बंद आहे. त्यामुळे सध्या केवळ गाडीखाना येथे तपासण्या होत आहेत. कमला नेहरु रुग्णालयातील मशीनची तातडीने दुरुस्ती करुन कार्यान्वित केले जाईल, अशी माहिती डॉ. बोराडे यांनी दिली. आशा स्वयंसेविकांना घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. प्राथमिक चाचणीसाठी लागणा-या किटही देण्यात आल्या आहेत.
खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांनी डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती महापालिकेकडे सादर करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनानेही डेंग्यू चाचणीसाठी 600 रुपयांचा दर निश्चित केला आहे. काही ठिकाणी अधिक शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
- डॉ. निना बोराडे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि साचलेले पाणी काढून टाका, जेणेकरून डासांची उत्पत्ती रोखता येईल. डास प्रतिबंधक औषधांचा वापर करणे, मच्छरदाणीमध्ये झोपणे आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घातल्यास डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या आजारांपासून बचाव होऊ शकतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
- डॉ. प्रतीक अग्रवाल, कन्सल्टंट, पेडियाट्रिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट