Pune News: सदनिकाधारकांचा अतिक्रमणाचा नवा फंडा; बाल्कनीच्या शेजारील डक्टमध्ये बेकायदेशीर बांधकामे

कारवाईसाठी पालिकेकडे नाही यंत्रणा
Pune News
सदनिकाधारकांचा अतिक्रमणाचा नवा फंडा; बाल्कनीच्या शेजारील डक्टमध्ये बेकायदेशीर बांधकामे File Photo
Published on
Updated on

निनाद देशमुख

पुणे: तुम्ही फूटपाथ, जमिनीवरील अतिक्रमणाविषयी ऐकले असेल. मात्र, शहरातील विविध सोसायट्यांमध्ये फ्लॅटधारकांकडून बाल्कनीच्या शेजारील रिकाम्या जागेत स्लॅब टाकून अतिक्रमण केले जात असल्याचा नवा ट्रेंड शहरात सुरू झाला आहे. या अनधिकृत बांधकामामुळे इमारतीच्या स्ट्रक्चरवर ताण येऊन इमारत कोसळण्याची शक्यता बांधकाम तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पुण्यात काही छोटे तर काही मोठे गृहप्रकल्प उभे झाले आहेत. या गृहप्रकल्पांतील सदनिकांमधील जागा मर्यादित आहे. त्यामुळे जागा वाढवण्याच्या उद्देशाने अनेक सदनिकाधारक सोसायटीची परवानगी न घेता बाल्कनी शेजारील जागेत लोखंडी बीम टाकून स्लॅब टाकून बांधकाम वाढवत आहेत. परिणामी, इमारतीच्या बांधकामावर याचा ताण येत आहे. भविष्यात अशा बांधकामांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Pune News)

Pune News
Illegal Spa Centre: मंद प्रकाशातील ‘त्या’ व्यवसायाचे सूत्रधार मोकाटच

इमारतीचे बांधकाम करताना ते मंजूर एफएसआयनुसार करणे अपेक्षित असते. बांधकाम व्यावसायिक दिलेल्या एफएसआय नुसार बांधकामे करतात देखील. जागा व परिसरानुसार बहुतांश गृहप्रकल्पाची बांधकामे करतांना कमी एफएसआय मिळाल्याने सदनिकांचे क्षेत्र देखील कमी होते.

सदनिका बांधताना मंजूर प्लॅनप्रमाणे बाल्कनी शेजारील जागा मोकळी ठेवली जाते. मात्र, याच जागेत सदनिकाधारक बांधकाम करून जागा वाढवून अतिक्रमण करत आहेत. महानगरपालिकेची बांधकाम नियमावली डावलून ही कामे केली जात आहेत.

Pune News
Domestic Harassment: पत्नीच्या त्रासामुळे पतीने संपवलं आयुष्य; समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कारवाईसाठी महानगरपालिकेकडे नाही यंत्रणा

पुण्यातील 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनेक सोसायट्या व मोठे गृहप्रकल्प आहेत. या प्रकल्पात अशी बांधकामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. ही कामे करतांना सोसायटीची परवानगी देखील घेतली जात नाहीत. यावर सोसायटीच्या सदस्यांनी आक्षेप घेऊनही बळजबरीने ही बांधकामे केली जात आहेत. दरम्यान, अशा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेकडे कोणतीही यंत्रणा नसल्याचे देखील समोर आले आहे.

गृहप्रकल्प तयार झाल्यावर तिथे राहण्यास आलेल्या सदनिकाधारकांची कमिटी तयार केली जाते. सदनिकेत कोणत्याही प्रकारचे कामे करताना या कमिटीची परवानगी घेणे आवश्यक असते. बाल्कनीच्यावर कच्चेबांधकाम करण्यास देखील परवानगी नाही. मात्र, सोसायटीचे नियम न पाळता व कमिटी सदस्यांना विश्वासात न घेता ही बांधकामे केली जात आहेत. इमारतीच्या दृष्टीने ही बांधकामे धोकादायक आहेत. याचा इमारतीवर परिणाम होऊन तिला तडे जाऊ शकतात व भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते. सूस, बाणेर, पाषाणसह शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात अशी बांधकामे केली जात आहेत. यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

- अनुप नाईक, रहिवाशी, एस थ्री प्राइम सोसायटी, सूस

बांधकाम व्यावसायिकाने भोगवटा पत्र दिल्यावर बाल्कनीच्या डकमध्ये अतिक्रमण केले जाते. अशा बांधकामामुळे इमारतीच्या स्ट्रक्चरवर परिणाम होतो. सोसायटीत अनेकजन असे प्रकार करतात. मात्र, याबाबत कुणी बोलत नाही. यावर कारवाई करण्याचा अधिकार सोसायटीच्या कमिटीला आहे. याबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 उपविधी कलम 169 ‘अ’ नुसार अतिक्रमण करणार्‍या सदनिका धारकांवर कारवाई करता येते. यासाठी कमिटीच्या सर्वसाधारण बैठकीत ठराव करता येऊ शकतो. दरम्यान, हा विषय सोसायटीच्या आत असल्याने महानगरपालिकेला या संदर्भात कारवाई करण्यास मर्यादा येतात.

- श्रेया घोरपडे, वकील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news