

पुणे: महापालिकेच्या विविध प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी विशेष वॉर रूमची स्थापना केली आहे. ही वॉर रूम आयुक्तांच्या थेट देखरेखीखाली कार्यरत राहणार आहे. सर्व संबंधित खातेप्रमुखांना दर पंधरा दिवसांनी त्यांच्या विविध प्रकल्पांचा प्रगती अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महानगर पालिकेमार्फत शहरात विविध विकासकामे आणि महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा देखील आहे, मात्र कामांच्या अंमलबजावणी दरम्यान अनेक अडचणी निर्माण होतात. याचा परिणाम प्रकल्यावर होतो तसेच ही कामे लांबतात व त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. यामुळे हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावे व त्यांची गुणवत्ता राखली जावई यासाठी आयुक्तांनी त्यांचा नियोजनबद्ध पद्धतीने पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Pune News)
समन्वय निर्माण करणार
या वॉर रूमचा मुख्य उद्देश म्हणजे प्रकल्पांशी संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय निर्माण करणे, कामाच्या अडथळ्यांची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना आखणे आणि राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांशी आवश्यक त्या पातळीवर चर्चा घडवून आणणे, असा स्पष्ट आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.
शहरात सुरू आहेत हे प्रमुख प्रकल्प
महापालिकेकडून केंद्रशासन, राज्यशासन तसेच सीएसआरच्या माध्यमातून जायका, नदीकाठ विकसन, समान पाणी योजना, कात्रज- कोंढवा रस्ता, शिवणे-खराडी रस्ता यासह वेगवेगळे उड्डाणपूलाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांची मुदत संपली आहे. तर काहींना मुदतवाढ देऊनही ते प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे.
प्रकल्प रखडल्याचा बसतोय फटका
महापालिकेचे सुरू असलेले हे प्रकल्प कोट्यवधी रकमांचे असून ते रखडल्याने त्यांचा खर्च वाढत आहे. याचा फटका वाहतूकीसह, महापालिकेच्या कामकाजालाही बसत आहे. त्यामुळे आयुक्तांकडून प्रकल्प का रखडले आहेत याबाबत सर्व विभागांकडून आढावा घेतला जाणार आहे.
उपायुक्तांना सादर करावा लागणार प्रगती अहवाल
वॉर रूममध्ये विशेष शाखेचे उपायुक्त हे खातेप्रमुखांकडून प्रकल्पांची प्रगती, अडचणी व अंमलबजावणीची माहिती गोळा करणार. हे अहवाल दर पंधरा दिवसांनी आयुक्तांसमोर मांडले जाणार आहे. प्रकल्पाशी संबंधित विविध विभागांमधील समन्वय, अडचणींचे निराकरण आणि शासनस्तरावरील आवश्यक समन्वय या सर्व बाबी वॉर रूमच्या माध्यमातून हाताळल्या जाणार आहेत.