

Prithviraj Chavan On Operation Sindoor: काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. चव्हाण यांनी संविधानानं मला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला असल्याचं सांगितलं.
पृथ्वीराज चव्हाण माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'मी माफी का मागू? मी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. मला संविधानाने प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आहे.'
तत्पूर्वी, पृथ्वीराज चव्हाण यांनी आदल्या दिवशी ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताचा पूर्णपणे पराभव झाला होता असा दावा केला होता. त्यानंतर या वादाला सुरूवात झाली. त्यांनी हे वक्तव्य पुण्यात माध्यमांशी बोलताना केलं होतं.
ते म्हणाले होते, 'ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी आपला पूर्णपणे पराभव झाला होता. ७ तारखेला आपण अर्धा तास जो काही अवकाशात जो काही संघर्ष झाला त्यात आपला पूर्णपणे पराभव झाला. लोकं हे मान्य करो अगर न करोत मात्र आपला पराभव झाला होता. भारताची विमाने पाडली गेली. आपली एअर फोर्स ही पूर्णपणे जमिनीवर होती. एकही एअर क्राफ्ट अवकाशात झेपावलं नाही.'
ते पुढे म्हणाले की, 'जर आपले कोणतेही विमान ग्वालेर, भटिंडा किंवा सिरसा एअरबेसवरून अवकाशात झेपावलं असतं तर पाकिस्ताननं ते खाली पाडलं असतं. त्यामुळंच एअर फोर्सने त्या दिवशी कोणतेही उड्डाण केले नाही.'
पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये फक्त हवाई हल्ले अन् मिसाईल वॉरफेअर झालं. जमिनीवर कोणतीही लष्करी हालचाल नव्हती. 'नुकतेच आपण ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाहिलं की एका किलोमीटरची देखील लष्करी हालचाल झाली नाही. त्या दोन ते तीन दिवसात जे काही झाल ते फक्त हवाई हल्ले अन् मिसाईल वॉरफेअर.
भविष्यात देखील युद्धे अशाच प्रकारची होतील. अशा परिस्थितीत आपल्याला १२ लाख सैनिकांचे लष्कर सांभाळण्याची गरज आहे का? त्यांना आपण दुसरी कामे देऊ शकतो का?' असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं.