

राहुल-प्रियांकांमुळं संसदेमधल्या चर्चेमध्ये जान
वडेट्टीवारांना फारसं महत्व नाही
काँग्रेसने कितीही आपटली तरी...
आता राज-उद्धव एकत्र आलेत...
Sanjay Raut Prais Rahul Gandhi: संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांची तोंडभरून स्तुती केली. ते अमित शहा हे राहुल गांधी यांना घाबरतात इथपर्यंत बोलले. मात्र त्याचवेळी संजय राऊत यांनी वेगळ्या विदर्भच्या मागणीवरून राज्यातील काँग्रेस नेत्यांना चांगलंच लाथाडलं. त्यांनी आम्ही वडेट्टीवारांना फारसं महत्व देत नाही असं म्हणत मराठी माणूस वेगळा विदर्भ होऊ देणार नाही असं ठणकावून सांगितलं.
संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत विधीमंडळातील कामकाजावरून टीका केली. त्यांनी, 'विधिमंडळाची गेल्या काही वर्षांमध्ये सर्कस झालेली आहे. सर्कस दशावतार म्हणा, विधिमंडळातल्या कामकाजाच आणि पार्लमेंट मधल्या कामकाजाच सुद्धा गांभीर्य संपलंय.'
यानंतर राऊत यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे तोंडभरून कौतुक केलं. ते म्हणाले, 'राहुल गांधी आणि प्रियंका गांधीमुळे संसदेमधल्या चर्चेमध्ये जान आहे. लोकशाही जिवंत असल्याचे एक भान आहे. संसदीय लोकशाहीमध्ये सभागृहात मग महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील विधानसभा आणि संसद असेल; सभागृहात विरोधी पक्ष नेता असणं ही लोकशाहीची गरज आहे.'
'यावेळेला राहुल गांधी यांनी स्वतःचे (काँग्रेस) १०० खासदार आणले, आमच्यासह मोठ्या प्रमाणात २४० लोक निवडून आल्यामुळं सत्ताधाऱ्यांना विरोधीपक्ष नेतेपद टाळता आलं नाही. मात्र त्यांनी विरोधीपक्ष नेत्याचा सतत आपमान कसा करता येईल हे पाहिलं आहे.' असंही राऊत म्हणाले.
पुढं पत्रकार परिषदेत बावनकुळेंच्या वेगळ्या विदर्भच्या मागणीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे पाठिंबा देताना दिसत आहेत असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी आम्ही वडेट्टीवारांना फारसं महत्व देत नाही असं म्हणत टोला हाणला.
राऊत पुढे म्हणाले की, 'आम्ही या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्व देत नाही. यापूर्वी देखील काँग्रेस आणि आमच्यामध्ये यावरूनच वाद झालेत. काँग्रेस एकसंध रहावा यासंदर्भात काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सहमती आहे. वरिष्ठांकडे दिल्लीत जाऊन काही होत नाही. काँग्रेसने कितीही आपटली तरी वेगळा विदर्भ होणार नाही. हे त्यांचे राजकारण आहे.'
राऊत यांनी भाजपवरही टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यांनी, 'भारतीय जनता पक्षाने किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही आता तर उद्धव ठाकरे राज ठाकरे मराठी माणसाच्या भूमिकेवर, महाराष्ट्राच्या भूमिकेवर एकत्र आहेत. त्याच्यामुळे कोणी हे स्वप्न पाहत असेल तर तो स्वप्नभंग होईल.'