पुणे : हनीट्रॅपमधून व्यावसायिकाला लुटणारे जेरबंद

पुणे : हनीट्रॅपमधून व्यावसायिकाला लुटणारे जेरबंद
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी परिसरातील एका व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून लुटणार्‍या तिघांना वारजे पोलिसांंनी अटक केली. अक्षय राजेंद्र जाधव (वय 28, रा. कर्वेनगर), शिवाजी गोविंदराव सांगोले (वय 34, रा. नर्‍हे), भरत बबन मारणे (वय 45, रा. रामनगर, वारजे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत एका व्यावसायिकाने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व्यावसायिक पिंपरी-चिंचवड शहरातील आहे. समाजमाध्यमातून त्याची एका महिलेशी ओळख झाली होती. महिलेने त्याच्याशी संपर्क साधून त्याला वारजे भागातील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले होते. आरोपी जाधव, सांगोले, मारणे तेथे दबा धरून बसले होते.

व्यावसायिक हॉटेलजवळ आला. तेव्हा तिघांनी त्याला धमकावण्यास सुरुवात केली. 'तू महिलांचे चित्रीकरण करतो. आम्ही पोलिस आहोत,' अशी बतावणी करून चोरट्यांनी त्याला वारजे भागातील एका बँकेच्या एटीएम केंद्रात नेले. तेथे त्याला धमकावण्यात आले. त्याच्या बँक खात्यातून 53 हजार रुपये काढून घेण्यात आले. व्यावसायिकाकडील रोकड चोरून आरोपी पसार झाले. घाबरलेल्या व्यावसायिकाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात आरोपी अक्षय जाधव हा वारजे भागातील हॉटेलजवळ थांबल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याबरोबर असलेले साथीदार सांगोले आणि मारणे यांना पकडले. पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील जैतापूरकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अजय कुलकर्णी, उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, अमेल राऊत, अमोल सुतकर, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, अजय कामठे, राहुल हंडाळ आदींनी ही कारवाई केली. सहायक निरीक्षक ए. बी. ओलेकर तपास करत आहेत.

म्हणून ते अशा सावजाच्या होते शोधात..
हनीट्रॅपमध्ये अडकवून एखाद्या व्यक्तीला लुटले तर बदनामी होईल या भीतीपोटी ती व्यक्ती पोलिसात तक्रार देत नाही, असा आरोपींचा समज होता. अक्षय याला मोबाईल तंत्रज्ञानाची चांगली माहिती आहे. त्यानेच फिर्यादींना हनीट्रॅपमध्ये खेचले. फिर्यादींसोबत महिलेने संभाषण केल्याची माहिती आहे. या टोळीत महिला सहभागी आहे का याचादेखील पोलिस तपास करत आहेत. शिवाजी आणि भरत हे दोघे प्लॉटिंग खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात, तसेच जेसीबीदेखील चालवतात. भरत हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुनाच्या गुन्ह्याचा देखील समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने आतापर्यंत असे कितीजणांना फसविले आहे याचा तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news