कारागृहातील विविध उद्योगांत काम करणार्या कैद्यांना दैनंदिन वेतन दिले जाते. कैदी त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू कारागृहातील उपाहारगृहातून खरेदी करतात. दैनंदिन वेतनापोटी मिळणारी रक्कम टपाल खात्याच्या सुविधेतून कुटुंबीयांना पाठविली जाते. काही कैदी दैनंदिन वेतनातून वकिलांचे शुल्क भरतात. कैदी कारागृहातील विविध उद्योगात काम करत असल्याने त्यांच्यात स्वावलंबनाची भावना निर्माण होते. कारागृहात सुतारकाम, लोहारकाम, चर्मकला, हातमाग, यंत्रमाग, बेकरी, उपाहारगृह, गॅरेज, मूर्तीकाम, होजिअरी उत्पादन, चादर, भांडी, दैनंदिन वापरातील वस्तू तयार करण्याचे उद्योग आहेत.