

पुणे: शालेय पोषण आहारासाठी प्रतिविद्यार्थी खर्चाची दरवाढ केली आहे. त्यानुसार पहिली ते पाचवीसाठी प्रतिविद्यार्थी 6 रुपये 78 पैसे, तर सहावी ते आठवीसाठी प्रतिविद्यार्थी 10 रुपये 17 पैसे दर निश्चित केला आहे. मार्चमध्येही दरवाढ केली होती. त्या तुलनेत आता पहिली ते पाचवीसाठी 59 पैसे, तर सहावी ते आठवीसाठी प्रति विद्यार्थी 88 पैसे वाढ झाली आहे. सुधारित दर 1 मेपासून लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त, तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. (Latest Pune News)
या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी 100 ग्रॅम, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी 150 ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो. केंद्र शासनाने 27 नोव्हेंबर 2024 रोजी दिलेल्या निर्देशानुसार मार्चमध्ये प्रतिविद्यार्थी खर्चाचे दर वाढवले.
त्या वेळी पहिली ते पाचवीसाठी 6 रुपये 19 पैसे, तर सहावी ते आठवीसाठी 9 रुपये 29 पैसे दर निश्चित केला होता. त्यानंतर पुन्हा 4 मार्च 2025 रोजी केंद्र सरकारने प्रति विद्यार्थी खर्चात दरवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार पहिली ते पाचवीसाठी प्रति विद्यार्थी 6 रुपये 78 पैसे, तर सहावी ते आठवीसाठी प्रति विद्यार्थी 10 रुपये 17 पैसे असे दर वाढवले आहेत.
नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीअंतर्गत तयार आहाराचा पुरवठा करणार्या यंत्रणांना पहिली ते पाचवीसाठी 6 रुपये 78 पैसे, सहावी ते आठवीसाठी 10 रुपये 17 पैसे या दराने अनुदान दिले जाणार असल्याचे नमूद केले.