वांग्यातील अळीचा प्रसार रोखणार ; मादी पतंगाला अंडी घालण्यापासून रोखण्यावर जगात प्रथमच शोध

वांग्यातील अळीचा प्रसार रोखणार ; मादी पतंगाला अंडी घालण्यापासून रोखण्यावर जगात प्रथमच शोध
Published on
Updated on

दिनेश गुप्ता : 

पुणे : वांग्यात होणार्‍या अळीचा प्रादुर्भाव रोखणे, हे अत्यंत अवघड आणि खर्चीक काम आहे. आयसर आणि इंडियन कौन्सिल फॉर अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्चमधील शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे संपूर्ण जगात आता वांग्याला अळीधारणाच होणार नाही. शास्त्रज्ञांनी जिरॅनिऑल नावाच्या नैसर्गिक रसायनाचा शोध लावल्याने हे जागतिक दर्जाचे संशोधन यशस्वी ठरले आहे. याचे संपूर्ण श्रेय या संशोधनात सहभागी तरुण शास्त्रज्ञांना जाते. पुणे येथील आयसरच्या (राष्ट्रीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेच्या) संशोधकांनी डॉ. सागर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले.

यात त्यांनी वांग्याच्या सात प्रकारच्या विविध जातींवर संशोधन केले. या जाती आयसरच्याच प्रांगणातील प्रायोगिक शेतात लावून दिवस-रात्र त्यांचा अभ्यास केला गेला. तेव्हा असे लक्षात आले की, मादी पतंग वांग्याच्या पानांवर रात्री नऊ ते एक वाजेच्या कालावधीत अंडी घालतात. सुरुवातीला अंड्यामधून अळी बाहेर निघते. ती खोड पोखरत वर फळापर्यंत जाते. या संशोधनात डॉ. सागर पंडित, ऋतुपर्णा घोष, डेनिस मेटझे, सुरहुद संत, मारुफ शेख, डॉ. आशिष देशपांडे आणि डॉ. ज्ञानेश्वर एम. फिरके यांचा समावेश होता.

मानवी आरोग्यालाही घातक नाही…
बटाटा आणि टोमॅटोनंतर वांगी ही भारतातील सर्वांत जास्त खाल्ल्या जाणार्‍या कुळातील भाज्यांमध्ये तिसरी आहे. वांगी ही भारतातील सर्वांत जास्त कीटकनाशक लागू असलेल्या वनस्पतींपैकी एक आहे. खोड आणि फळ पोखरणार्‍या पतंगाच्या हल्ल्यामुळे पीक उत्पादनात 45 ते 100 टक्के नुकसान होऊ शकते. शिवाय, सिंथेटिक कीटकनाशकांच्या मोठ्या प्रमाणात वापरामुळे मानवी आरोग्यास गंभीर नुकसान होते आणि कर्करोग हा एक धोका आहे. या शोधामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या वांगी पिकाचे संरक्षण करण्यातच मदत होणार नाही, तर जिरॅनिऑल हा पूर्णपणे खाण्यायोग्य घटक असल्याने मानवी आरोग्याला होणारी हानी देखील दूर होईल. हा शोधनिबंध मार्च 2023 मध्ये 'न्यू फायटोलॉजिस्ट' या शास्त्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे.

असा केला फ्रुट अँड शूट बोरल अळीचा खात्मा
संशोधक विद्यार्थ्यांनी असे संशोधन केले की, रात्री नऊ ते एक वाजता वांग्याच्या झाडाभोवती पतंग येतात. ते डॉ. ज्ञानेश्वर एम. फिरके यांनी तयार केलेल्या ठउ- ठङ-22 जातीवर अंडी घालत नाहीत. ठउ- ठङ-22 मध्ये असे कुठले रसायन आहे, ज्याने पतंग रोखला जाईल, याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला. संशोधनानंतर असे लक्षात आले की, या जातीच्या पानांमधून जिरॅनिऑलचा वास येतो. जिरॅनिऑल फवारताच वांग्याजवळ पतंग येत नाही व अळीची धारणा होत नाही; म्हणून वांगी किडण्याचा प्रसंगच येत नाही.

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news