

बारामती : पुढारी वृत्तसेवा
वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे कोऱ्हाळे खुर्द रस्त्यावर पोलिस असल्याची बतावणी करत ज्येष्ठाकडील सोनसाखळी हातचलाखीने लांबविल्याची घटना गुरुवारी (दि. १७) घडली. या घटनेत तीन तोळे वजनाची सोन्याची साखळी अज्ञाताने लंपास केली. दरम्यान, अशा लोकांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शासकिय खात्यातून निवृत्त झालेल्या सावता नामदेव हिरवे (वय ६६, रा. वडगाव निंबाळकर) यांची या घटनेत फसवणूक झाली. गुरुवारी दुपारी ते वडगाव निंबाळकर -कोऱ्हाळे खुर्द रस्त्यावर असताना डोक्यावर टोपी, अंगावर खाकी रंगाची पॅंट परिधान करत एक व्यक्ति दुचाकीवरून तेथे आला. त्याने स्वतः पोलिस असल्याची बतावणी केली. त्यांच्याकडील तीन तोळे वजनाची सोन्याची साखळी काढून ठेवण्यास सांगत हातचलाखीने ती लंपास केली आणि वडगाव बाजूने सुसाट निघून गेला. वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणी ज्येष्ठाची फिर्याद घेतली जात असल्याचे वडगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी सांगितले.
पोलिसांसारखा पेहराव करून पोलिस असल्याची बतावणी करत लुटीच्या घटना घडतात. हे लोक पुढे नाकाबंदी सुरु आहे, दंगल सुरु झाली आहे, त्यामुळेगळ्यातील दागिने, हातातील अंगठ्या काढून ठेवा, असे सांगतात. ते काढत असताना मदत करण्याच्या बहाण्याने हे दागिने हातचलाखीने लंपास करतात. गर्दी नसणाऱ्या भागात अथवा एकएकट्या वृद्धांना, महिलांना गाठून असे प्रकार केले जातात. पोलिसांकडून कधीही दागिने काढून ठेवा वगैरे सांगितले जात नाही. त्यामुळे अशा लोकांपासून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
– सोमनाथ लांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक,