

पुणे: पुण्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाचा ट्रेंड बदलला आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडत असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते, तर काही ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण होते. त्यामुळे या वर्षी रस्त्यांवर तसेच कुणाच्या घरात पाणी जाऊ नये, यासाठी महानगरपालिकेने काळजी घ्यावी.
शहरातील कामे वेळेत पूर्ण करावी, तसेच नालेसफाईची कामे पूर्ण झाली असल्यास क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे पूर्ण झाल्याचा अहवाल, फोटो व्हिडीओ मागून घ्यावे तसेच याबाबत अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या अधिकार्यांना दिल्या. (Latest Pune News)
पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी तसेच महापालिकेने केलेल्या विविध कामांचा आढावा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी (दि. 16) घेतला. या वेळी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मोहोळ यांनी बैठकीत घेतलेल्या आढाव्याची माहिती दिली. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार हेमंत रासने, भीमराव तापकीर, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह अनेक माजी नगरसेवक देखील उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले की, पुण्यात पावसाळ्यात नागरिकांची मोठी गैरसोय होते. अनेक भागांत पाणी तुंबल्याच्या तक्रारी देखील येत असतात. त्यामुळे या वर्षी अशा तक्रारी येणार नाहीत तसेच शहरांतील कोणत्याही भागांत पावसाचे पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत.
शहरात ज्या ठिकाणी पाणी साठते त्या ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा पाणी साठणार्या जागांची पाहणी करून तेथे योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत अधिकार्यांना सांगितले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कामे वेगाने व दर्जेदार करावीत, अशा सूचनादेखील दिल्या आहेत.
मान्सूनपूर्व कामाची जबाबदारी असलेले ठेकेदार चांगली तसेच वेळेत कामे पूर्ण करीत नसतील, तर त्यांना काळ्या यादीत टाकावे. याबाबत महापालिकेच्या अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचनादेखील प्रशासनाला देण्यात आल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
201 पाणी साठणार्या जागांपैकी 117 जागांचे काम पूर्ण
शहरात व समाविष्ट गावे मिळून पाणी साठणार्या (क्रॉनिक स्पॉट) 201 जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. यातील 117 जागांवर आवश्यक त्या उपाययोजना करून काम पूर्ण करण्यात आल्याने या ठिकाणी पाणी साठणार नाही, तर उर्वरित 84 जागांवर काम सुरू करण्यात आले असून, ही कामे पावसाळापूर्वी पूर्ण होतील.
ज्या 39 जागांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे काम यंदा पूर्ण होऊ शकणार नाही, त्या ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामासाठी पुणे शहरासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडून जो निधी मंजूर होऊन आलेला आहे, तो महापालिकेला तातडीने कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे मोहोळ यांनी सांगितले.
आंबिल ओढ्याचे काम पूर्ण
पुण्यात तब्बल 875 किमी लांबीचे नाले आहेत. या नालेसफाईचे काम सध्या सुरू आहे. 2019 मध्ये आंबिल ओढ्याला पूर आला होता. यामुळे जीवितहानीदेखील झाली होती. त्यामुळे या नाल्याभोवती भिंती उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम पूर्ण झाले असून, गेल्या काही वर्षांत कोठेही पाणी साठले नाही अथवा कोणाच्या घरात पाणी गेले नाही, पावसाळ्यात अनेकांना त्रास होतो. पालिकेवर प्रशासक असले तरी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे आम्ही कुणाला त्रास होऊ देणार नाही, असेदेखील मोहोळ यांनी स्पष्ट केले.