पुणे: श्वानांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी एक गाय रविवार पेठेतील एका जुन्या वाड्याच्या दुसर्या मजल्यावर चढली. मात्र, जिन्यावरून खाली उतरता येत नसल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी गायीला क्रेनच्या मदतीने सुखरूप खाली उतरविले. मात्र, गाय वाड्याच्या दुसर्या मजल्यावर जिना चढून गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अग्निशमन दलाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, एक जर्सी गाय चरण्यासाठी बाहेर पडली होती. त्या वेळी तिच्यामागे 10 ते 15 श्वान लागले होते. घाबरलेल्या अवस्थेत ही गाय रविवार पेठेतील परदेशीवाड्याच्या लहान दरवाजातून जिन्याने दुसर्या मजल्यावर चढली. मात्र, त्यानंतर खाली कसे उतरायचे, हे तिला समजत नव्हते. (Latest Pune News)
यानंतर सकाळी साडेआठ वाजता स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, गायीला दुसर्या मजल्यावरून खाली उतरता येत नव्हते.
तसेच तिच्या पोटात दूध असल्याने तिला हालचाल करणेसुद्धा अवघड जात होते. यामुळे गायीच्या मालकाला बोलावून तिच्या पोटातील 15 ते 20 लिटर दूध काढण्यात आले. गायीला इजा होऊ नये म्हणून तिला सेफ्टी बेल्ट बांधून खासगी क्रेनच्या माध्यमातून दुसर्या मजल्यावरून सुरक्षितरीत्या खाली उतविण्यात आले.
ही कारवाई प्रभारी अधिकारी प्रशांत गायकर, लीडिंग फोरमन (तांडेल) मंगेश मिळवणे, जवान सागर शिर्के, तेजस पटेल, निकेतन पवार, तेजस चौगुले, प्रशांत कसबे आदींनी केली.