Shivaji Maharaj Tricked Mughal: पुरंदरच्या तहात शिवरायांनी दिला मोगलांना चकवा; अस्तित्वात नसलेला खडकाळा गड दिला

परिसरात शिवकालीन स्थळांचा ठेवा
Shivaji Maharaj Tricked Mughal
पुरंदरच्या तहात शिवरायांनी दिला मोगलांना चकवा; अस्तित्वात नसलेला खडकाळा गड दिलाPudhari
Published on
Updated on

दत्तात्रय नलावडे

वेल्हे: छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती, कुशल प्रशासन, मानव कल्याणकारी कार्याचा गौरव देश-विदेशात केला जातो. शत्रूला युद्धात तसेच तहातही शिवाजी महाराज कसे चकवा देत, हे ऐतिहासिक दस्तावेजांच्या संशोधनातून पुढे आले आहे. पुरंदरचा तह हे याचे उत्तम उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंहगडजवळील किल्ल्याच्या आकाराच्या डोंगराला खडकाळा गड नाव देत, तो पुरंदरच्या तहात मोगलांना दिला होता.

जयपूर येथील ऐतिहासिक दप्तरात पुरंदर तहाची सविस्तर माहिती आहे. यात शिवरायांनी मोगलांना तहात दिलेल्या 23 किल्ल्यांची यादी आहे. त्यात आठव्या क्रमांकावर खडकाळा किल्ल्याचे नाव आहे. कोंढाणा किल्ल्याजवळील खडकाळा गड व त्यावर नेमणूक करण्यात आलेला मोगल अंमलदार गाझीबेग अशी माहिती या दस्तवेजात आहे. (Latest Pune News)

Shivaji Maharaj Tricked Mughal
Talegaon Dhamdhere ZP Division: नवलच...तळेगाव ढमढेरे गावाची दोन जिल्हा परिषद गटात विभागणी!

मोगलांना तहात दिलेल्या किल्ल्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पुरंदर गडाचा उल्लेख आहे. रुद्रमाळ (वज्रगड) गडाचा उल्लेख दुसर्‍या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे अस्तित्वात नसलेल्या खडकाळा गडावर आणि रुद्रमाळ (वज्रगड) गडावरही मोगली अंमलदार म्हणून गाझी बेग यांचीच नेमणूक केली होती.

सिंहगड (कोंढाणा) गडावरून तसेच इतर ठिकाणांवरून किल्ल्यासारख्या दिसणार्‍या मेंगजाई डोंगराला किल्ल्याचे नाव देऊन प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेला किल्ला मोगलांना तहात दिला. मेंगजाई डोंगरावर खडकात खोदलेली पाण्याची तळी आहेत. तसेच चोहोबाजूंना कडेकपारी आहेत. त्यामुळे याला खंदकडा किंवा खडकाळा या नावाने शिवकाळात ओळखले जात होते.

11 जून 1665 रोजी मोगल सरदार मिर्झाराजा जयसिंग यांच्याशी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवरायांनी स्वराज्याचे 23 किल्ले मोगलांना दिले. यात खंदकडा किंवा खडकाळा, रुद्रमाळ (वज्रगड) या नावांच्या किल्ल्यांसह कोंढाणा (सिंहगड), कर्नाळा, तुंग, रोहिडा, लोहगड, तिकोना, विसापूर, सागरगड, सोनगड, नळदुर्ग, पळसगड आदी 23 किल्ल्यांच्या समावेश आहे.

अस्तित्वात नसलेल्या खडकाळा गडाची फारशी माहिती नाही. सिंहगड किल्ल्याच्या दक्षिणेला प्रत्यक्षात हा गडही नाही. मात्र दुरून भव्य किल्ल्यासारखा दिसणार्‍या या डोंगरावर शिवकालीन श्री मेंगजाईदेवीचे मंदिर आहे, त्यामुळे या डोंगराला मेंगजाई डोंगर म्हणून ओळखले जाते. सिंहगड किल्ल्यावरून या भव्य किल्ल्यासारख्या दिसणार्‍या डोंगराचे अगदी जवळून दर्शन होते. पर्यटक, दुर्गप्रेमींनाही याचे मोठे आकर्षण आहे.

Shivaji Maharaj Tricked Mughal
Gunjawani Water Project: गुंजवणी प्रकल्प मुख्य जलवाहिनी वर्षभरात पूर्ण करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

मेंगजाई डोंगरावर खडकात खोदलेली पाण्याची तळी आहेत. शिवकालीन चौकी पाहर्‍यांचे अवशेष आहेत. तसेच दुरून तटबंदी बुरुजाच्या आकाराचे खडक दिसतात. मेंगजाईदेवीच्या दर्शनासाठी कोळवडी व परिसरातील भाविक येतात. सिंहगड, मेंगजाई

डोंगराच्या परिसरातील कोळवडी, वांगणी, कातवडी, रहाटवडे, कल्याण, कोंढापूर परिसरात शिवकालीन वास्तू, स्थळे, मंदिरे, रणसंग्रामाची ठिकाणे आहेत. वांगणी येथील दिगंबर दिनकर चोरघे पाटील यांच्या शेतात शिवकालीन वीरगळ (वीर मावळ्याची समाधी) आहे.

चोरघे यांचे पणजोबा कै. मानाजी चोरघे पाटील यांनी आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा ठेवा जतन केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यानंतरच्या छत्रपतींच्या सैन्यात वांगणी, कोळवडी, वांगणी वाडी, रहाटवडे, कल्याण, कोंढाणपूर, आर्वी, कुसगाव, खेड शिवापूर आदी गावांतील अठरापगड जातीच्या शूर विरांनी योगदान दिले आहे. याची साक्ष देणार्‍या शिवकालीन वीरगळी, वास्तू स्थळे मंदिरे या परिसरात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news