

संतोष वळसे पाटील
मंचर: तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या त्रिस्तरीय समितीने दिव्यांग शिक्षकांची स्वतः पाहणी करणे व प्रमाणपत्राची पडताळणी करणे आवश्यक होते. परंतु त्रिस्तरीय समिती कागदावरच दिसली. प्रत्यक्षात त्यांनी पाहणी केली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
राज्य शासनाच्या दि. 16 जून 2025 च्या परिपत्रकानुसार शिक्षक बदलीमध्ये संवर्ग 1 चा लाभ घेणार्या दिव्यांग कर्मचार्यांची दिव्यांगत्वाची व प्रमाणपत्राची तपासणी करण्याबाबत सूचित केले आहे. तालुका त्रिस्तरीय सदस्य समिती यांना ज्यांच्याबाबत शंका आहे, अशा कर्मचार्यांना पडताळणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे पाठवायचे होते. (Latest Pune News)
परंतु या त्रिस्तरीय समितीने कोणत्याही प्रकारची पडताळणी केल्याची माहिती अखेर जाहीर केलेली नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सरसकट सर्वच विभागप्रमुख यांना दिव्यांग कर्मचार्यांना जे. जे. हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी तपासणी करून घेण्याबाबत मंगळवारी (दि. 8) एक आदेश काढत कळवले आहे. जिल्हा परिषदेने यापूर्वी सरसकट सर्व दिव्यांग कर्मचार्यांना ससून रुग्णालयात पाठवले होते.
त्या ठिकाणी यंत्रणेअभावी तपासणी होऊ शकली नाही. शासन निर्णयानुसार प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सक यांनाच आहेत. पुणे जिल्ह्यात शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले कार्यरत आहेत.
त्यांच्यामार्फत तपासणी करणे आवश्यक असताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिव्यांग कर्मचार्यांना वैद्यकीय अधीक्षक अधिष्ठाता ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठवले. त्या ठिकाणी ससून अधीक्षक, अधिष्ठाता यांनी तपासणी करण्याबाबत असमर्थता दर्शवली.