

Pranjal Khewalkar Kharadi Party Case Update:
पुणे : पुण्यातील खराडी येथील ड्रग पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा सहभाग आढळल्यानंतर त्यांना अटक झाली होती. मात्र नुकताच याप्रकरणात आरोपींच्या ड्रगसेवनचा फॉरन्सिक अहवाल पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामध्ये प्रांजल खेवलकर याचा ड्रगचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Pune News)
जुलैच्या महिना अखेरीस खराडी येथील हॉटेलमधील खोलीत सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा घालून कारवाई केली. या पार्टीत अमली पदार्थ, दारु, हुक्काचे सेवन केले जात असल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणींसह सात जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून 2 ग्रॅम 70 मिलीग्रॅम कोकेन, 70 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ, हुक्का पात्र, दहा मोबाइल संच, सुगंधी तंबाखू, दोन मोटारी, मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र प्रांजल खेवकलकरच्या रक्तात ड्रगच आढळले नसल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याचं या अहवालातून स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले होते. काही दिवसांपूर्वी हे फॉरेन्सिकचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले आहेत.