

पुणे : ज्येष्ठ कथक नृत्य कलाकार, गुरू आणि कला छाया संस्थेच्या संस्थापिका प्रभा मराठे (वय 90) यांचे बुधवारी (दि. ३१) अल्पशा आजाराने निधन झाले. मराठे यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.
मराठे यांनी सुरुवातीला कथक नृत्याचे शिक्षण दिवंगत ज्येष्ठ नृत्यगुरू रोहिणी भाटे यांच्याकडून घेतले. भाटे यांच्या गीत गोविंद आणि कृष्ण- कोयना यांसारख्या प्रसिद्ध नृत्यनिर्मितीमध्ये प्रमुख नृत्य कलाकार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्या महाराष्ट्रातील पहिल्या नृत्य कलाकार होत्या, ज्यांना दिवंगत ज्येष्ठ नृत्यगुरू पंडित बिरजू महाराज यांच्याकडे कथ्थकचे धडे गिरवण्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली.
१९६४ मध्ये त्यांनी दिल्लीतील भारतीय कला केंद्रामध्ये कथक नृत्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी जयपूरमधील एका शाळेत नृत्य शिक्षिका म्हणून काम केले. मराठे यांनी कथक नृत्याच्या लखनऊ घराण्याचे शास्त्रयुक्त आणि परंपरागत शिक्षण पुण्यात रुजवले. त्यांनी देश-विदेशात महोत्सवात, कार्यक्रमात आपली कथ्थक नृत्यकला सादर करीत दाद मिळवली. पुढे त्यांनी कला छाया संस्थेची स्थापना केली. संस्थेद्वारे त्यांनी नवोदित कलाकारांच्या कला सादरीकरणाला व्यासपीठ दिले.
तसेच या माध्यमातून त्यांनी ज्येष्ठ कलाकारांची ओळख पुणेकरांना करून दिली. त्यांनी अनेक नृत्यनाटिकांसह काही मराठी नाटकांचे नृत्य दिग्दर्शनही केले. १९८४ मध्ये राज्य सरकारने कला छाया सांस्कृतिक केंद्रासाठी जागा दिली. याठिकाणी आज रंगीत तालमीसाठी सभागृह, कलादालन, निवासी व्यवस्था आणि सादरीकरणासाठी खुले रंगमंच आहे. मराठे यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.