पदव्युत्तर पदवी वैद्यकीय प्रवेशाच्या जागा वाढल्या..!

पदव्युत्तर पदवी वैद्यकीय प्रवेशाच्या जागा वाढल्या..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अर्थात एनएमसीने 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी नवीन पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आणि पदव्युत्तर पदवीच्या जागा वाढवण्यासाठी 153 अर्ज मंजूर केले आहेत. त्यामुळे 110 महाविद्यालयांमध्ये नवीन पीजी वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. तर 43 महाविद्यालयांमध्ये पीजी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार असल्याचे एनएमसीने स्पष्ट केले आहे. सध्या देशात एमबीबीएसच्या 1 लाख 8 हजार 990 जागा आहेत, तर पीजीच्या 69 हजार 694 जागा आहेत.

गेल्या महिन्यात आयोगाच्या वैद्यकीय मूल्यांकन आणि मानांकन मंडळाने 101 अर्ज मंजूर केले होते. आता बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पीजी अभ्यासक्रमही सुरू करता येणार आहेत. एमएस जनरल सर्जरी, एमएस-ईएनटी, एमएस सायकियाट्री, एमडी कम्युनिटी मेडिसिन, एमडी पॅथॉलॉजी, एमडी रेडिओ डायग्नोसिस, एमडी नेस्थेसियोलॉजी यासह अनेक अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये वाढ होणार आहे. 2028-29 पर्यंत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याच्या योजनेवर काम केले जात आहे.

2013-14 मध्ये देशात 387 वैद्यकीय महाविद्यालये होती, ती आता 706 झाली आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्याही वाढत आहे. एमबीबीएस केल्यानंतर पीजीच्या जागा वाढविण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना देशात पीजीसाठी अधिक संधी मिळतील. देशातील पीजी मेडिकल कॉलेजमध्ये नीट पीजी परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जातो. तर एमबीबीएस इत्यादी पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये नीट यूजीच्या आधारे प्रवेश दिला जातो. केंद्रीय आणि राज्य कोट्यासाठी नीट यूजी समुपदेशन स्वतंत्रपणे आयोजित केले जाते. केंद्रीय कोटा समुपदेशन पूर्ण झाल्यानंतरच राज्य कोटा समुपदेशन होते. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांचा टक्का वाढल्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news