पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर सोमवारी (दि. 27) मोर्चा काढला. रात्री उशिरापर्यंत कोणाच्या आशीर्वादाने शहरातील पब सुरू असतात? असा प्रश्न अंधारे आणि आ. धंगेकर यांनी उपस्थित केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांना पब आणि हॉटेलकडून मिळणार्या हप्त्यांची यादी अंधारे आणि आ. धंगेकर यांनी वाचून दाखवली. हप्ते मागणार्या कर्मचार्यांची यादी धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांच्याकडे सादर केली.
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर व ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावरून महायुतीच्या मंत्र्यांना धारेवर धरले. पुण्यात दर 15 दिवसांनी गांजा आणि ड्रग सापडत असेल, तर उत्पादन शुल्क विभाग काय करतोय? संबंधित खात्याच्या मंत्र्यांचा अधिकार्यांवर वचक नाही का? अधिकारी त्यांचे आदेश ऐकत नाहीत का? असे सवाल विचारत सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना लक्ष्य केले.
तुम्ही पापं करताय, तुम्हाला लय समजतं का, तुम्ही दर महिन्याला 70 ते 80 लाख रुपये हप्ता घेता, याची यादी माझ्याकडे आहे. तुम्ही स्वत:ला शहाणे समजता का, तुम्ही पुणे उद्ध्वस्त केलंय, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? एकापाठोपाठ एक अशा प्रश्नांची सरबत्ती आ. रवींद्र धंगेकर यांनी केली. या वेळी धंगेकर यांनी हप्ते घेणार्या उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी-अधिकारी यांची नावे देखील वाचून दाखवली. पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल, तर तुम्ही एक पत्रादेखील टाकू शकत नाही, मग शहरातील पब सकाळी चार वाजेपर्यंत कसे चालतात? याचा जाब विचारण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत, असे रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना सुनावले. आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत, यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही. आमच्याकडे तुमच्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिला.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत वारंवार कारवाई मोहिम राबविण्यात येते. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जास्त गुन्हे दाखल झाले असून दुप्पट मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विभागामार्फत आतापर्यंत आठ हजारांहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. पुणे जिल्ह्यात सततच्या कारवायांमार्फत मागील वर्षभरात 500 कोटींपेक्षा जास्त महसूल देण्यात आला आहे. पब, बार व हॉटेल मालकांबाबतही हीच परिस्थिती असून मागील वर्षीच्या तुलनेत कारवाईच्या संख्येत वाढ झाली आहे. यंदा 550 पेक्षा जास्त परवानाधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 17 परवाने निलंबित करण्यात आले आहे. तर, दोन परवाने कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. विभागामार्फत बार मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात येतो.
– चरणसिंह राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग
हेही वाचा