नियुक्तीसाठी शिक्षकांचा महापालिकेत ठिय्या!

Teacher File Photo
Teacher File Photo

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून महापालिकेत करण्यात आलेल्या शिक्षक भरतीतील पात्र-अपात्र उमेदवारांची यादी जाहिर करावी, तसेच तत्काळ महापालिकेच्या सेवेत नियुक्ती व्हावी, या मागणीसाठी सोमवारी शिक्षक भरतीतील उमेदवारांनी महापालिका आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पवित्र प्रणालीमार्फत पुणे महापालिकेतील शाळांसाठी मराठी माध्यमातील 287, इंग्रजी माध्यमातील 140 आणि उर्दू माध्यमातील 24, अशा एकूण 441 शिक्षकांची कागदपत्रे पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेच्या शिक्षण मंडळाने पात्र-अपात्र यादी लावणे अपेक्षित होते. परंतु, गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही अद्याप पात्र-अपात्र यादी घोषित केलेली नाही. तसेच, समुपदेशनाबाबत अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झाली नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

याबाबत पुणे महापालिकेसह पुणे शिक्षण मंडळाला उमेदवारांनी 250 हून अधिक मेल केले. तसेच 100 हून अधिक वेळा माहिती अधिकारातून माहिती विचारली तसेच आयुक्त कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन 8 ते 10 वेळा निवेदने दिली आहेत. त्यानंतरही कोणताही प्रतिसाद प्रशासनाकडून न मिळाल्याने उमेदवारांनी आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडला होता. तसेच पुढे काय कार्यवाही केली जाणार, याचे लेखी उत्तर द्यावे, अशी मुख्य मागणी केली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे काही शिक्षक न्यायालयात गेल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे याबाबत निर्णय घेता आलेला नाही, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news