

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कायद्याने सज्ञान होईपर्यंत आम्ही आमच्या मुलांना कधीही कार चालवू दिली नाही. आपल्या संविधानाप्रमाणे पोलिसांनी कारवाई करावी. आमची लेक तर गेली; पण दुसर्या कुणावरही अशी वेळ येऊ नये म्हणून पोलिसांनी आपल्या संविधानाप्रमाणे कारवाई करावी, असे म्हणत अश्विनी कोस्टा हिच्या वडिलांनी हंबरडा फोडला. या वेळी वडील, भाऊ आणि आईला आवरणे कठीण झाले होते.
हे दृश्य होते जबलपूरमध्ये राहणार्या अश्विनीच्या घराच्या परिसरातले. पुण्यात शिकायला असलेली अश्विनी कोस्टा हिचा कल्याणीनगरातील अपघातात जागीच मृत्यू झाला. एका श्रीमंत बिल्डरच्या मुलाने आपल्या लेकीचा जीव घेतला, इतकेच त्यांना समजले. संगणक अभियंता असलेली अश्विनी दिसायला खूप सुंदर तर होतीच; पण हुशारही होती. तिच्या मृत्यूची बातमी काळताच जबलपूरमधील तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शनिवारी रात्री अपघात झाल्याने रविवारी तिच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. दुःख अनावर झाल्याने तिचे आई-वडील पुण्यात आले नाहीत. नातेवाइकांनीच मृतदेह गाडीने पुण्यातून सोमवारी जबलपूरला नेला.
अश्विनीचा भाऊ म्हणाला, इतक्या लहान मुलाला दोन कोटी रुपये किमतीची कार दिलीच कशी? मी सीसीटीव्ही फुजेट पाहिले. मला कुणीतरी ते पाठविले. त्यात तो मुलगा कार इतक्या वेगाने चालवतोय की ती काही क्षणांंत दिसेनाशी होत आहे.
अश्विनीच्या कुटुंबीयांची अवस्था पाहून प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दुसर्या दिवशी तिच्या घरी पुन्हा गेले. आई, वडील आणि भावाला त्यांनी बोलते केले. तेव्हा आई हताश आणि नि:शब्द झाली होती. वडिलांनी रडत-रडत बळ एकवटले. डबडबले डोळे आणि कापर्या स्वरांत म्हणाले, आम्ही पण आमच्या मुलांना कार देऊ शकलो असतो. पण, कायद्याने सज्ञान होईपर्यंत त्यांना आम्ही कधीच कार चालवू दिली नाही. दुसर्या कोणावरही अशी वेळ येऊ नये म्हणून संविधानाप्रमाणे पोलिसांनी कारवाई करावी.
लाडक्या लेकीच्या मृत्यूची बातमी शनिवारी रात्रीच अश्विनीच्या कुटुंबीयांना समजली. तेव्हापासून तिच्या घरी नातेवाइकांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली. मुलीच्या आठवणीने आई, वडील आणि भाऊ सतत रडत होते. तिचा मृतदेह पुण्याहून नातेवाईक सोमवारीच घेऊन गेले. मृतदेह जबलपूरला पोहोचताच आई, वडील आणि भाऊ यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यांना नातेवाईक आधार देत होते.
हेही वाचा