पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुठे मोठ-मोठे खड्डे, तर कुठे स्थानकाच्या भिंतींना पावसाळ्यातील गळतीमुळे बुरशी आलेली. कुठे छपराचे सिमेंट निखळलेले, तर कुठे कचर्याचे, घाणीचे, भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य पसरलेले. अशी स्थिती आहे, पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), पुणे बसस्थानकाची. एसटी स्थानकामध्ये प्रवाशांना येणार्या समस्यांसंदर्भात दै.'पुढारी'च्या वतीने गुरूवारी पुण्यातील तिन्ही एसटी स्थानकांमध्ये जाऊन पहाणी करण्यात आली. त्यावेळी विविध समस्या पहायला मिळाल्या. पूर्वीपेक्षा काही समस्या संपुष्टात आल्या असल्या तरी एसटी प्रशासनाला बारामती एसटी स्थानकाप्रमाणेच पुनर्विकासाच्या पुण्यातही ठोस उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे पहाणीदरम्यान समोर आले आहे.
मला अनेकदा एसटीने प्रवास करावा लागतो. लहानपणी एसटी स्थानकांवरून अनेकदा प्रवास करायचे. त्यावेळी स्थानके अजिबात घाण नसायची. स्थानकात आले की बसचा आवाज आणि इंधनाच्या धुराचा वेगळाच वास असायचा. आता त्या जोडीला दुर्गंधी, स्वच्छतागृहांमधील वास स्थानकावर पसरलेला असतो. यावर प्रशासनाने उपाययोजना करून, तातडीने स्वच्छतेकडे
लक्ष द्यावे.– आनंद पाठक, प्रवासी
बसस्थानकावर बसायला सध्या भीती वाटते. कारण स्थानकांच्या छपराकडे पाहिल्यावर ते डोक्यात पडते की काय? अशी भीती वाटते. स्वच्छ अशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दिसत नाही. ठिकठिकाणी कचरा, भटकी कुत्री दिसतात. स्थानकाच्या इमारतीही जुन्या झाल्या आहेत.
– कविता गायकवाड, प्रवासी
हेही वाचा