

पुणे: ‘शहरी गरीब योजनेअंतर्गत उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृतदेह पुन्हा हॉस्पिटलने आठ तास अडवून ठेवल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे. बिल तयार करण्यासाठी वेळ लागणार असल्याने नातेवाईक पैसे भरायला तयार असूनही मृतदेह सकाळी साडेनऊ वाजता ताब्यात देण्यात आला, अशी तक्रार नातेवाइकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे केली आहे.
शुक्रवार पेठेतील महेश पाठक (वय 53) यांच्यावर पूना हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान त्यांचा शुक्रवारी (25 एप्रिल) रात्री दीड वाजता मृत्यू झाला. ‘शहरी गरीब योजने’चे बिल सकाळी साडेआठनंतर होईल, असे म्हणत सकाळी साडेनऊ वाजता तब्बल आठ तासांनी मृतदेह ताब्यात दिला.
बिल भरायला तयार असून देखील याबाबत सकाळीच कार्यवाही होऊ शकते, असे सांगत मृतदेह अडवून ठेवला. त्याबाबत महापालिकेच्या तक्रार निवारण कक्ष येथे फोन करून आरोग्यप्रमुखांना लेखी तक्रार दिली आहे, अशी माहिती रुग्णाचे नातेवाईक नीलेश महाजन यांनी दिली.
रात्री उशिरा रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक मृतदेह सकाळीच घेऊन जातात. रात्रीच्या वेळी बिलिंग विभागात कर्मचारी असतात. मात्र, रात्रीच्या वेळी आपत्कालीन विभागातील कर्मचारी अंदाजे बिल करतात. यानुसार कर्मचार्यांनी रात्री अंदाजे रकमेची माहिती दिली होती. ही रक्कम भरून नातेवाईक मृतदेह घरी घेऊन जाऊ शकतात. मात्र, नातेवाईक आणि कर्मचार्यांमध्ये योग्य संवाद न झाल्याने हा प्रकार घडला, असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
मला या घटनेबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. रुग्णाने तक्रार केल्याबद्दलही कल्पना नाही. पुणे महापालिका आमच्याशी संपर्क साधेल, तेव्हा याबद्दल बोलता येऊ शकेल.
- डॉ. जे. रवींद्रनाथ, मुख्य कार्यकारी अधिकारी, पूना हॉस्पिटल
रुग्णाच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने याप्रकरणी चौकशी केली जाईल. सर्व बाबींची तपासणी केल्यानंतर समोर येणार्या निष्कर्षाच्या आधारे रुग्णालयावर योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, महापालिका