

पिंपरखेड: शिरूर तालुक्यातील शरदवाडी येथे अज्ञात समाजकंटकाकडून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंब बागेच्या शेतातील फळधारणा सुरू झालेली सुमारे १ हजार ३०० झाडे तोडून नासधूस करण्यात आल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत परिसरातील शेतकऱ्यानी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
समाजकंटकांनी केलेल्या निर्दयी कृत्यामुळे शेतकऱ्याची मेहनत मातीमोल झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून नुकसान करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जांबुत-शरदवाडी परिसरातील शेतकरी शहाजी निवृत्ती थोरात व दिलीप निवृत्ती थोरात यांनी आपले शेतात दीड वर्षांपूर्वी भगवा जातीच्या तेराशे डाळिंब रोपांची सुमारे तीन एकर क्षेत्रावर लागवड केली होती.
लाखो रुपयांचे भांडवल लावून फळधारणा झालेल्या डाळींब बागेची पुढील तीन महिन्यात डाळिंब फळे काढणीस येणार होती मात्र गुरूवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटाकाकडून सर्वच १३०० झाडे तोडून टाकण्यात आली आहे. यामध्ये शेतकरी थोरात यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन योग्य तपास करून या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी थोरात यांनी केली आहे.
अज्ञात समाजकंटकाने गुरुवारी रात्रीच्या वेळी शेतकरी दिलीप थोरात व शहाजी थोरात यांच्या शेतात प्रवेश करून पूर्ण वाढ झालेली आणि नुकतीच फळधारणा सुरू झालेली जवळपास १३०० डाळींबाची झाडे निर्दयपणे तोडून टाकली. झाडे तोडल्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून, दीड वर्षांची मेहनत मातीमोल झाली आहे. शेतीत प्रचंड मेहनत आणि पैसा गुंतवून उभी केलेली बाग एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी थोरात पूर्णतः हताश झाले आहेत. डाळींब बागेसाठी केलेला खर्च, झाडांची वाढ आणि आगामी काळात येणारे उत्पन्न विचारात घेता २५ ते ३० लाख रूपयांचे नुकसान झाले.
पुढील दहा वर्षे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या नगदी पिकावर झालेला हा आघात गंभीर असून शेतकरी थोरात यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हा केवळ डाळींब पिकांवर आघात नव्हे, तर शेतकऱ्याच्या जिवावर उठण्याची घटना आहे, अशा तीव्र शब्दांत परिसरातील शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. अगोदरच शेतकरी संकटाशी दोन हात करत असताना समाजकंटकांकडून शेतकऱ्यांचे अशा प्रकारे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी या घटनेचा निषेध केला असून या समाजकंटकांचा शोध घेऊन पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.