

Devram Lande son missing police investigation
जुन्नर: वाढदिवसानिमित्त काढलेल्या विनापरवानगी मिरवणुकीत डीजे वाहनाच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू आणि सहा जण जखमी झाल्याच्या दुर्घटना प्रकरणातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांना चार दिवसांची पोलिस कोठडी (दि. 15 सप्टेंबरपर्यंत) जुन्नर न्यायालयाने सुनावली.
या घटनेतील डीजे वाहनचालक नामदेव रोकडे हा देखील पोलिस कोठडीत असून, अन्य फरार असलेल्या दोन आरोपींपैकी देवराम लांडे यांचा मुलगा अमोल लांडे आणि डीजे मालक सौरभ शेखरे यांच्या शोधासाठी दोन पोलिस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती या गुन्ह्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप मोरे यांनी दिली. (Latest Pune News)
बुधवारी (दि. 10) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास जुन्नरला ही दुर्घटना घडली होती. त्यात आदित्य काळे या युवकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुख्य आरोपी लांडे यास ताब्यात घेत त्यांच्यासह अन्य आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता; मात्र देवराम लांडे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
उच्च रक्तदाबाचा विकार बळावल्याने त्यांना तेथून चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात तर तेथून पुढे ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. मिरवणुकीत नाचणारे लांडे यांना आताच कसे अस्वस्थ वाटून ते रुग्णालयात दाखल झाले याबाबत नागरिकांमध्ये चर्चा होत होती.
दरम्यान पोलिसांनी त्यांची मेडीकल कस्टडी मागून घेतली होती. त्यावर न्यायालयाने उपचारातून डिस्चार्ज मिळताच त्यांना जुन्नर न्यायालयासमोर हजर करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी (दि. 11) रात्री त्यांना ससून रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी रात्रीच त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक संदीप मोरे यांनी दिली, तर त्यांचा मुलगा अमोल आणि डीजे मालक शेखरे याच्या अटकेसाठी दोन पथके रवाना केल्याची माहिती त्यांनी दिली.
डीजेकडे दुर्लक्ष केल्याने पोलिसांवर कारवाईची मागणी
मिरवणुकीत बेकायदेशीरपणे डीजे वाजत असतानाही पोलिसांनी संबंधितांना हटकले नाही. परवानगी न घेता सुरू असलेल्या मिरवणुकीत जर अगोदरच डीजे ताब्यात घेतला असता तर एका निष्पाप जीवाचा बळी गेला नसता. त्यामुळे पोलिसांना मिरवणुकीबाबतची माहिती असताना पोलिस प्रशासनाच्या थेट हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला. परिणामी याला जबाबदार असलेल्या पोलिसांवर देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जुन्नर तालुकाध्यक्ष गणेश वाव्हळ यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.