पोलिसांची कुठलीही नरमाईची भूमिका नाही : पोलिस आयुक्त अमितेश कुमार

पोलिसांची कुठलीही नरमाईची भूमिका नाही : पोलिस आयुक्त अमितेश कुमार

पुणे : आयटी अभियंता तरुण- तरुणीच्या अपघाती मृत्यू प्रकरणात पोलिसांनी कुठलीही नरमाईची भूमिका घेतलेली नाही. आरोपी अल्पवयीन असल्याने यापेक्षा वेगळी कायदेशीर भूमिका घेण्यास काही मर्यादा आल्या. जर कोणी यापेक्षा वेगळी भूमिका घेऊ शकतो आणि पुणे पोलिसांनी घेतली नाही, असे दाखवून दिले, तर जनतेची जाहीर माफी मागण्यास तयार असल्याचे सोमवारी (दि.20) पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार स्पष्ट केले.

अपघात प्रकरणातील आरोपी मोठ्या घरातील असल्याने त्याच्यासोबत नरमाईची भूमिका घेतल्याची टीका पुणे पोलिसांवर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमितेश कुमार बोलत होते. या वेळी ते म्हणाले की, या प्रकरणावर मी स्वतः हा लक्ष ठेवून असून, अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना करत आहे. सुरुवातीलाच या प्रकरणात भादंवि कलम 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अल्पवयीन आहे.
मात्र, हा गुन्हा गंभीर असून, आरोपीला सज्ञान म्हणून कारवाई करण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज सुटीच्या बाल न्याय मंडळ न्यायालयात करण्यात आला होता. मात्र, बाल न्याय मंडळाने तो अर्ज फेटाळला. तसेच अल्पवयीन आरोपीला 14 दिवस निरीक्षणगृहात ठेवण्यासाठी मागणी करण्यात आली होती. तीदेखील फेटाळण्यात आली. मद्यप्राशन करून आरोपी गाडी चालवत होता हे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे.

कुठलाही दगा-फटका होऊ नये म्हणून त्याच्या रक्ताचे सॅम्पल ससूनबरोबरच इतर एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्याचे डीएनए सॅम्पलसुद्धा घेऊन ठेवण्यात आले आहे. अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी कशी दिली म्हणून त्याच्या वडिलांवरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजपर्यंत असे कधीच घडले नव्हते. याचबरोबर त्याला बार आणि पबमध्ये प्रवेश देणार्‍या हॉटेल कोझीचे मालक नमन भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी थातुरमाथूर कारवाई केली, असे कोणीही समजू नये. सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांद्वारे या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे. आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. कार कधी घेण्यात आली होती, तिच्या तात्पुरत्या नंबर प्लेटची मुदत कधी संपली, नंबर प्लेट का नव्हती या सगळ्याची चौकशी करण्यात येऊन त्यानंतर जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करणार. अनेक सामाजिक आणि राजकीय लोक भेटत आहेत, त्याचे म्हणणे पण ऐकून उपाययोजना केल्या जातील. सीसीटीव्हीची पाहणी करून घटनाक्रम पाहून चौकशी करणार आहोत.

पब आणि बारला ठरवून देण्यात आलेल्या वेळेची मर्यादा पाळण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. पबच्या बाहेर कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. त्यासाठी पोलिस अधिकार्‍यांसोबत बैठक झाली आहे. वाहतूक नियमांचा भंग तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍यांविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांशी याबाबत आम्ही चर्चा केली आहे.

– अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे.

वेळ आल्यास पबमध्ये घुसून कारवाई

आजपर्यंत पब वेळेत बंद करण्यात आले की नाही, आवाजाची मर्यादा पाळण्यात येत नाही असे सगळे बाहेरून पाहिले जात होते. मात्र, आता पोलिस वेळप्रसंगी पबमध्ये आत जाऊन पाहणी करणार. अल्पवयीन मुलांना पब आणि बारमध्ये प्रवेश दिला जाऊ नये. वेळेची मर्यादा पळण्याबाबत काम करण्यात येत आहे. पबबाहेर आणि आत शिस्त लावण्याबाबत अनेक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत रूपरेषा ठरविण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांवर चुकीचे आरोप

सर्व कायदेशीर बाबी विचारात घेऊन पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. अपघात प्रकरणात मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली, असे कोणी समजू नये किंवा तसे आरोपही करू नयेत. अपघात प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news