Police Drug Nexus Maharashtra: खाकीच नशेत? अहिल्यानगर ते पुणेपर्यंत पोलिस–ड्रग रॅकेटचे धक्कादायक वास्तव

अमली पदार्थ तस्करीत पोलिसांचा सहभाग उघड, ‘कुंपणच शेत खाते’ अशी स्थिती निर्माण
Police Drug
Police DrugPudhari
Published on
Updated on

अशोक मोराळे

पुणे: ‌‘सद्रक्षणाय... खलनिग््राहणाय...‌’ अर्थात सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश, अशी शपथ घेऊन पोलिस दलात भरती होणाऱ्या काही पोलिसांनी या दलाची मान शरमेने खाली जावी असेच कृत्य केले आहे. गेल्या आठवड्यात पुणे ग््राामीण पोलिसांनी अमली पदार्थतस्करी प्रकरणात अहिल्यानगर पोलिस दलातील एका पोलिस हवालदाराला बेड्या ठोकल्या. तपासात तो पोलिसच या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचे समोर आले.

Police Drug
Maharashtra TET Result: राज्य टीईटी अंतिम निकाल जाहीर; 50 हजारांहून अधिक उमेदवार उत्तीर्ण

पोलिस आणि अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांचे लागेबांधे असण्याचा हा काही पहिलाचा प्रकार नाही. यापूर्वी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिसाने तर आपल्या गावात मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ तयार करण्याचा कारखानाच थाटला होता, तर 2024 मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकाला मेफेड्रॉन विक्रीतून कोट्यधीश होण्याचा मोह चांगलाच अंगलट आला होता. त्यामुळे ‌‘खाकी‌’वर अमली अंमल वाढतोय, असे म्हटले तर गैर ठरणार नाही. खरेतर शिस्त आणि कायद्याचे रक्षणकर्ते म्हणून सर्वत्र पोलिस दलाची ख्याती. परंतु, हेच दल गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी कृत्य, लाचखोरी व बेशिस्त वर्तनामुळे बदनाम होऊ पाहते आहे. पोलिस दलातील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरफादा उचलत अशा काही गोष्टी केल्या, ज्यातून पोलिसांनाच पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची वेळ आली.

Police Drug
Environment Pollution Cancer Risk: वाढते तापमान व प्रदूषणामुळे कर्करोगाचा धोका वाढतोय; तज्ज्ञांचा इशारा

पोलिसांने कायदा मोडणे आणि सर्वसामान्य नागरिकांनी कायद्याची चौकट ओलांडणे, यात मोठा फरक आहे. पोलिसांची समाजात एक वेगळीच ओळख आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. नागरिक त्यांच्याकडे नेहमीच वेगळ्या नजरेतून पाहत असतात. त्यामुळे कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे तेच गुन्हेगारी कृत्य करीत असतील तर त्याचा गांभीर्याने वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे. देशातील काही प्रमुख समस्यांपैकी अमली पदार्थाची नशाखोरी ही एक तरुणाईपुढील मोठी समस्या आहे. ही नशा भारतीय तरुणाईचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहे. केंद्रीय गृह विभागाने ड्रगबाबतीत कठोर धोरण अवलंबिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर नुकतीच महाराष्ट्रात अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात अमली पदार्थतस्करीवर अंकुश ठेवून कारवाई करण्याचे अधिकार या पथकाला देण्यात आले आहेत. असे असताना पोलिसच जर अमली पदार्थ विक्रीच्या रॅकेटमध्ये सहभागी असतील, तर ‌‘कुंपणच शेत खाते‌’ अशी स्थिती निर्माण होत असल्याने काही पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Police Drug
Purandar International Airport: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी कर्ज उभारणार; 10 फेब्रुवारीला मंत्रिमंडळात प्रस्ताव

अहिल्यानगरचा पोलिस हवालदार

अहिल्यानगर पोलिसांच्या केंद्रीय मुद्देमाल कक्षातील अल्प्राझोलम हा अमली पदार्थ चोरी करून बाहेर विक्री केल्याच्या प्रकरणात पोलिस हवालदार श्यामसुंदर विश्वनाथ गुजर याला गेल्या महिन्यात पुणे ग््राामीण पोलिसांनी अटक केली. मुद्देमाल कक्षाची जबाबदारी या गुजरवर होती. त्यानेच चोरी करून हा अमली पदार्थ विक्रीसाठी बाहेर काढला होता. त्याने विक्रीसाठी बाहेर काढलेला अल्प्राझोलम हा अमली पदार्थ श्रीरामपूर पोलिसांनी 2025 मध्ये कारवाई करून जप्त केलेला होता. गुजर हा अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत हवालदार या पदावर कार्यरत होता. तो मुद्देमाल कारकून म्हणून काम पाहत होता. त्यामुळे त्याला कोणत्या कारवाईत किती अमली पदार्थ जप्त केले, याची माहिती होती. त्याच संधीचा फायदा घेत त्याने हे कृत्य केले. गुजरने मुद्देमाल कक्षातून अल्प्राझोलम हा अमली पदार्थ बाहेर काढताना आपली चोरी पकडू नये म्हणून त्या ठिकाणी अमली पदार्थासारखा दिसणारा दुसरा तत्सम पदार्थ ठेवला होता. याप्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांनी पोलिस हवालदार गुजर याच्यासह पाच जणांना अटक केली आहे.

Police Drug
Pune Indelible Ink Election: मार्कर पेनच्या गोंधळानंतर पुन्हा पारंपरिक शाई; जि.प.–पं.स. निवडणुकीसाठी आयोगाचा निर्णय

पोलिसाने थाटला मेफेड्रॉनचा कारखाना

मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेला पोलिस हवालदार प्रमोद केंद्रे याने आपल्या लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यात असलेल्या रोहिना गावात गावच्या शिवारात मेफेड्रॉन (एमडी) तयार करण्याचा कारखाना थाटला होता. मुंबई येथील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने केलेल्या कारवाईत हा प्रकार चव्हाट्यावर आला होता. एप्रिल 2025 मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. या वेळी पथकाने 17 कोटी रुपयांचा ड्रगसाठा जप्त केला होता. मुंबई येथील एका ड्रगतस्करासोबत केंद्रे याची ओळख झाली. त्याने केंद्रेला ड्रग तयार करण्याचे प्रशिक्षण दिल्याचे सूत्र सांगतात. केंद्रेला यातून मोठा पैसे मिळेल, असे वाटले. त्यातूनच त्याने आपल्या गावी ड्रगनिर्मितीचा कारखाना थाटल्याचे बोलले जाते.

कोट्यधीश होण्याचा मोह अंगलट

झटपट कोट्यधीश होण्याचा मोह पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील एका तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकाच्या चांगलाच अंगलट आला होता. नाकाबंदीत मिळालेल्या ड्रगची विक्री करताना हा पोलिस उपनिरीक्षक जाळ्यात अडकला होता. त्याच्याकडून 44 कोटी 79 लाख 80 हजार रुपये किमतीचे 44 किलो 790 ग््रॉम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले होते. 2024 मध्ये हा प्रकार समोर आला होता. विकास शेळके असे या तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकाचे नाव होते. आरोपी शेळके हा त्या वेळी निगडी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होता. पिंपळे निलख येथील विशालनगर परिसरात एक जण मेफेड्रॉन (एमडी) विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सांगवी पोलिसांनी आरोपी नमामी शंकर झा याला पकडले. चौकशीत शेळके याने हे ड्रग त्याच्याकडे दिल्याचे समोर आले. 26 फेबुवारी रोजी रात्री पुणे-मुंबई महामार्गावर निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मालवाहू गाडीतून मेफेड्रॉन असलेले पोते रस्त्यावर पडले. हे पोते शेळके याच्याकडे पोहचले. खरेतर त्याने याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन पुढील कार्यवाही करणे गरजेचे होते. परंतु, त्याने मेफेड्रॉन विक्रीतून आपण कोट्यधीश होऊ, असे स्वप्न रंगवले. अखेर पोलिस त्याच्यापर्यंत पोहचले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news