

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल (टीईटी) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा तब्बल 50 हजार 369 उमेदवार उत्तीर्ण झाले असून, दोन्ही पेपर मिळून तब्बल 11.28 टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी निकालाबाबतची माहिती दिली.परीक्षा परिषदेतर्फे 23 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील 37 जिल्हा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेची अंतरिम उत्तरसूची 19 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 आणि 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तरांसंदर्भातील त्रुटी, आक्षेप 27 डिसेंबरपर्यंत मागवण्यात आले होते. दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची 13 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
यंदा पहिल्यांदाच 11 टक्क्यांहून अधिक उमेदवार उत्तीर्ण
परीक्षा परिषदेने 2013 पासून एकूण आठ वेळा टीईटी परीक्षा घेतली. तसेच, परीक्षा दिलेल्या 29 लाख 74 हजार 600 उमेदवारांपैकी 1 लाख 6 हजार 663 उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यामुळे टीईटीमध्ये पात्र ठरण्याचे सरासरी प्रमाण 3.5 टक्के आहे. आतापर्यंत सर्वाधिक निकाल 2018 मध्ये 5.13 टक्के, त्यापूर्वी 2013मध्ये 5.02 टक्के लागला होता. बाकी सर्व परीक्षांचा निकाल 2.3 टक्के ते 3.70 टक्के या दरम्यान आहे. तर, 2018 आणि 2019 या वर्षीच्या परीक्षांतील गैरप्रकारांमध्ये सहभाग असलेल्या 9 हजार 537 उमेदवारांची संपादणूक रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, यंदा पहिल्यांदाच 11 टक्क्यांहून अधिक उमेदवार उत्तीर्ण झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.