

पुणे: वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये इंटर्नशिप करायची असते. मात्र, विद्यार्थी त्यांना नेमून दिलेल्या आरोग्य संस्थेमध्ये उपस्थित राहत नसल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे.
भावी डॉक्टरांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी इंटर्नशिप काळात त्यांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. इंटर्नशिप प्रमाणपत्राला बायोमेट्रिक हजेरी जोडली जाणार आहे.बीएएमएस, बीयूएमएस आणि परदेशातून वैद्यकीय अभ्यासक्रम (एमबीबीएस) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप कालावधीमध्ये बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे. (Latest Pune News)
याबाबत पुणे परिमंडळाच्या उपसंचालक कार्यालयाकडून पुणे, सोलापूर आणि सातारा येथील जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची यादी संबंधित आयुर्वेद/युनानी महाविद्यालये किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून या शासनाला पाठवली जाते.
त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी वर्ग केले जाते. इंटर्नशिपमधील काम विद्यार्थ्यांनी गांभीर्याने घ्यावे आणि आरोग्यसेवा देण्यास कटिबद्ध राहावे, यासाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे.
हजेरीबाबत केलेल्या सूचना
विद्यार्थ्यांना जे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येईल, त्या आरोग्य संस्थेमध्ये बायोमेट्रिक प्रणाली लागू राहील.
संबंधित आरोग्य संस्थेमधील वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधीक्षक/जिल्हा शल्यचिकित्सक यांनी इंटर्नशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देताना त्यासोबत संबंधित आंतरवासिता विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक हजेरीपत्रक जोडायचे आहे. यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, आरोग्य संस्थेचे नाव, विद्यार्थ्यांची येण्याची वेळ, जाण्याची वेळ, कामाचे तास इ. बाबींचा स्पष्ट उल्लेख असेल.
बायोमेट्रिक हजेरीपत्रकाची सत्यता तपासूनच संबंधित आरोग्य संस्थेच्या वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक किंवा जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्वतःच्या सही व शिक्क्यासह प्रमाणित करायचे आहे.
विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासोबत देण्यात आलेल्या बायोमेट्रिक हजेरीपत्रकाची पडताळणी आपल्या स्तरावरील बायोमेट्रिक लॉगिनवरून करायची आहे.
विद्यार्थ्यांना जे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येईल, त्या आरोग्य संस्थेमध्ये बायोमेट्रिक प्रणाली लागू राहील. आरोग्य संस्थांना देण्यात येणार्या नियमित भेटींमध्ये विद्यार्थी नियमितपणे उपस्थित आहेत किंवा नाही, याची पडताळणी केली जाणार आहे.
- डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे परिमंडल