पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक संघटनांकडून निगडी, भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक येथील सेक्टर क्रमांक 24 मधील वाणिज्य भूखंडाची जागा शिवजयंती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती, विविध जयंती महोत्सव आणि निगडी गावजत्रेसाठी मिळावी, अशी आग्रही मागणी सुरू होती.
दरम्यान, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) निगडी गावठाणाजवळील पर्यायी एक एकर जागा या जयंती उत्सवाच्या सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीसह शहरातील विविध संघटनांकडून भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकातील या जागेसाठी सातत्याने मागणी सुरू होती. सातत्याने आंदोलने, निदर्शने आणि पत्रव्यवहार सुरू होता. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेदेखील ही जागा मिळण्याची मागणी केली होती.
संबधित जागेवरील 5 भूखंड वाणिज्य वापरासाठी असून, त्याची लिलावप्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे ती जागा उत्सवासाठी देण्याचा प्रस्ताव पीएमआरडीएकडून वारंवार अमान्य करण्यात आला आहे. त्यानंतर लोकप्रतिनिधी व विविध संघटनांच्या मागणीचा विचार करुन निगडी गावठाणाला लागून असलेल्या सेक्टर क्रमांक 21 येथील सर्व्हे क्रमांक 83 मधील खुली जागा क्रमांक 9 ही पीएमआरडीएच्या ताब्यातील एक एकर जागा सार्वजनिक वापरासाठी देण्याचा निर्णय झाला आहे.
ही जागा पीएमआरडीएकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला 18 ऑगस्टला हस्तांतरीत करण्यात आली आहे. या जागेचा विविध संघटनांनी शिवजयंती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती, विविध जयंती महोत्सव तसेच, निगडी ग्रामस्थांच्या गावजत्रेसाठी वापर करावा. पीएमआरडीएने पर्यायी जागा मंजूर केल्याने विविध संघटनांच्या जागा मागणीला दिलासा मिळाला आहे, असे पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल यांनी म्हटले आहे.
भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समिती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उत्सव समिती आणि इतर विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी (दि.22) घेण्यात येणार आहे. या बैठकीत आमच्या मागण्या आणि पीएमआरडीएकडून पर्यायी जागा देण्याबाबत झालेला निर्णय यावर चर्चा केली जाईल. त्यावर आमची पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल, असे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगितले.
हेही वाचा