

पुणे : पुण्यातील वाहतूककोंडीला अतिक्रमणे, गरजेपेक्षा रुंद पादचारी मार्ग, सायकल मार्ग, खड्डे, पार्किंग आदी जबाबदार असल्याचे पालिकेने सादर केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. हा अहवालच अत्यंत त्रोटक आणि कालबाह्य विचारांना खतपाणी घालणारा असून, तो अशाश्वत, अवैज्ञानिक आणि दिशाभूल करणारा असल्याचा आरोप नागरी संस्था, वाहतूक व पर्यावरण कार्यकर्त्यांनी करत रोष व्यक्त केला. यानंतर पालिकेला जाग आली असून, शहरातील पदपथ अरुंद न करता ते आहे तसेच ठेवून उपाययोजना केल्या जातील, असा खुलासा शुक्रवारी पथ विभागाने केला आहे. (Latest Pune News)
पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करणासाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी पथविभागाला शहरातील प्रमुख 32 रस्ते व 200 जंक्शन येथील स्थळ पाहणी करून वाहतूक कोंडीची कारणे शोधण्यास सांगितले होते. पथ विभागाच्या तब्बल 200 पथकांनी प्रत्यक्ष पाहणी करून याबाबतचा अहवाल सादर करत वाहतूक कोंडीला अतिक्रमण, मोठे पदपथ, झाडे, रिक्षा थांबे या सारखी अनेक घटक कारणीभूत असल्याचे अहवालात म्हटले होते. मात्र, हा अहवाल दिशाभूल करणारा व चुकीचा असल्याचा आरोप करत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंटचे हर्षद अभ्यंकर, परिसर संस्थेच्या प्रांजली देशपांडे आणि रणजित गाडगीळ व पर्यावरण प्रशिक्षण केंद्राचे संस्कृति मेनन यांनी देखील या अहवालावर आक्षेप घेतला आहे. पुण्यात वाहतूक कोंडीची कारणे सांगताना पुणे महानगरपालिकेने पुन्हा एकदा खाजगी वाहनधारकांच्या बाजूने कल दाखवला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाने खाजगी वाहनांची वाढती संख्या याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ‘फुटपाथ अरुंद करणे, सायकल मार्ग काढून टाकणे’ अशा योजना पुढे रेटल्या आहेत.
या उपाययोजना केवळ शहरी वाहतूक धोरणांना नव्हे तर मनपाच्या स्वतःच्या सायकल प्लॅन आणि पादचारी धोरणाला तिलांजली देणाऱ्या आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. वाहतूक कोंडीवर उपाय शोधताना खाजगी वाहनांचा वापर वाढत जाणे हा मुद्दा सोडून इतर किरकोळ कारणांवर उपाययोजना करणे ‘दात कोरून पोट भरण्यासारखं आहे,’ असा आरोप सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंटचे संचालक हर्षद अभ्यंकर यांनी केला आहे.
आतापर्यंत 2012 मध्ये महापालिका, 2018 मध्ये पीएमआरडीए आणि 2025 मध्ये महामेट्रोने कॉम्प्रेहेन्सिव्ह अहवाल सादर केले. या तिन्ही अहवालात शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रामुख्याने पायी चालणे, सायकलिंग आणि सार्वजनिक वाहतूक वाढविणे यावर भर दिला होता. पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून शहरात उड्डाणपूल उभारले, रस्त्यावरील दुतर्फा पार्किंग वाढविली आणि आता बीआरटीपाठोपाठ सायकल मार्ग संपविण्याच्या तयारीत आहेत.
पार्किंग धोरणालाही पायदळी तुडविले
पार्किंगमुळे रस्ते अडले हे मान्य करताही, मनपाने ‘अधिक पार्किंग शोधा’ असा हास्यास्पद मार्ग सुचविला आहे. मोफत व अमर्याद पार्किंगमुळे खाजगी वाहनांचा वापर वाढतो, हे मनपाच्या स्वतःच्या पार्किंग धोरणात नमूद आहे. मग अशा पद्धतीने कोंडी कमी कशी होणार? असा सवाल उभा राहतो, असा आरोप देखील नागरिकांनी केला आहे.
सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी राबविलेली बीआरटी मनपाने प्रवाशांचा व पीएमपीएमएलचा विश्वास न घेता हळूहळू संपवली. आता सायकल मार्गही हटवून खाजगी वाहनांसाठी रस्ते मोकळे करण्याचा डाव रचला जातोय.
अलीकडेच 36 टक्के बस भाडेवाढ करून मनपाने नागरिकांवर आर्थिक बोजा टाकला. परिणामी अनेक प्रवासी सार्वजनिक वाहतुकीतून दुचाकीकडे वळले. हीच वाढती खासगी वाहनसंख्या आज वाहतूक कोंडीला जबाबदार आहे. तरीही प्रशासन ते मान्य करण्याऐवजी उलट उपाय शोधतंय, याचा कार्यकर्त्यांनी निषेध केला.
पदपथाची रुंदी करणार नाही : महापालिकेचा खुलासा
पुणे शहरातील 32 रस्त्यांवर वाहतूक कोंडीला भाजी आणि फळविक्रेते, अनधिकृत पार्किंगसह इतर कारणे जबाबदार असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या पथ विभागाने केलेल्या पाहणीत नोंदविले आहे. त्यानुसार रस्त्यावरील पदपथांची रुंदी कमी करून रस्ता वाढविण्यात येण्याची माहिती समोर आली होती, परंतु या माहितीत तथ्य नसून पुणे महापालिका ही पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. पादचाऱ्यांसाठी पदपथाची रुंदी कमी करण्याची तडजोड महापालिकेच्या विचाराधीन देखील नाही, असा खुलासा महापालिकेच्या पथ विभागाने केला आहे.
रस्त्यांवर तसेच प्रमुख चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरातील प्रमुख 32 रस्ते व 22 चौकांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. अनावश्यक मोठे असलेले पादचारी मार्ग लहान केले जाणार आहेत. मात्र हे करताना अर्बन स्ट्रीट डिझाइन गाइडलाइनचे निकषांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नमूद केलेल्या निकषांपेक्षा पादचारी मार्ग लहान होणार नाहीत, असा खुलासा पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी केला आहे.