

पुणे: वाढता बेशिस्तपणा रोखण्यासाठी पीएमपी अध्यक्ष महेश आव्हाड यांनी आता ठेकेदारांच्या चालकांना सीआयआरटीचे प्रशिक्षण सक्तीचे केले असून, त्या प्रशिक्षणाला सुरुवातदेखील झाले आहे. दर दोन दिवसांनी 45 चालकांना सीआयआरटीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय, पीएमपीच्या स्वत:कडील चालकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
रस्त्यातच सातत्याने प्रवाशांशी आणि इतर वाहनचालकांशी होणारे वाद, रस्त्यावरील वाढते अपघात, बस बेकडाऊन आणि महापालिका येथून बस चोरीला जाणे, यांसारख्या अनेक प्रकरणांमुळे पीएमपी अध्यक्ष आव्हाड यांनी ठेकेदारांसाठी नवी नियमावलीसह आता ठेकेदारांच्या चालकांना सीआयआरटीचे प्रशिक्षण सक्तीचे केले आहे.
45 चालकांची एक बॅच नुकतीच पूर्ण झाली असून, दुसऱ्या 45 चालकांच्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. कामाचा वेग वाढविण्यासाठी दर दोन दिवसांनी 45 चालकांची एक बॅच याप्रमाणे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. जोपर्यंत ताफ्यातील शेवटच्या चालकाचे प्रशिक्षण पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही मोहीम आता सुरूच राहणार आहे. पीएमपीच्या ताफ्यातील चालक आता अधिक प्रशिक्षित आणि सज्ज होणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने कायमस्वरूपी आणि कंत्राटी अशा दोन्ही प्रकारच्या चालकांसाठी व्यापक प्रशिक्षण मोहीम हाती घेतली आहे.
वाहकपदावर असलेल्या चालकांनाही देणार प्रशिक्षण
पीएमपीकडे सध्या एकूण 2,498 कायमस्वरूपी चालक कार्यरत आहेत. त्यापैकी 1,947 चालकांनी आपले विशेष प्रशिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित चालक सध्या वाहकपदाची जबाबदारी सांभाळत असल्याने त्यांना पहिल्या टप्प्यात सामावून घेण्यात आले नाही. मात्र, पुढील टप्प्यात या चालकांनाही आवश्यक ते प्रशिक्षण देणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेे.
प्रवाशांचा प्रवास सुरक्षित ही आमची प्राथमिकता आहे. आमचे स्वतःचे चालक असोत किंवा ठेकेदारांकडे काम करणारे चालक, प्रत्येकाला रस्ते सुरक्षा आणि शिस्तीचे प्रशिक्षण देणे अनिवार्य आहे. सध्या आम्ही दर दोन दिवसांनी 45 चालकांची बॅच याप्रमाणे नियोजन सुरू केले आहे. ताफ्यातील सर्व चालकांचे प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया सुरू राहील.
महेश आव्हाड, अध्यक्ष, पीएमपीएमएल